वाढदिवसाच्या दिवशीही पवार उतरणार रस्त्यावर; विरोधकांचा आज हल्लाबोल मोर्चा

वाढदिवसाच्या दिवशीही पवार उतरणार रस्त्यावर; विरोधकांचा आज हल्लाबोल मोर्चा

मोर्चात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे १२ डिसेंबरला पवारांचा वाढदिवस आहे. तब्बल ३७ वर्षांनंतर पवार हे वाढदिवशी नागपूरच्या रस्त्यावर आंदोलनात उतरल्याचे पहायला मिळणार आहे.

  • Share this:

नागपूर, 12डिसेंबर:   काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात आज विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.  मोर्चात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे १२ डिसेंबरला पवारांचा वाढदिवस आहे. तब्बल ३७ वर्षांनंतर पवार हे वाढदिवशी नागपूरच्या रस्त्यावर आंदोलनात उतरल्याचे पहायला मिळणार आहे.

या मोर्चापूर्वीच राष्ट्रवादीने विदर्भात सरकारविरोधी वातावरण तापविण्यासाठी १ डिसेंबरपासून यवतमाळ येथून हल्लाबोल दिंडी पदयात्रा सुरू केली. १५५ किलोमीटरचा प्रवास करीत ११ व्या दिवशी ही दिंडी सोमवारी सकाळी नागपूर शहराच्या हद्दीत दाखल झाली आहे. पदयात्रेला पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ हॉटेल प्राईडच्या पूर्वी अडवलं.

दिंडीला अडवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली व रस्त्यावरच ठाण मांडले. दरम्यान, पोलिसांनी सुप्रिया सुळे  आणि अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि कार्यकर्ते शांत झाले.  मोर्चाच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण महिनाभरापासून राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून ते नागपुरात तळ ठोकून आहेत. कोणत्या जिल्ह्यातून किती लोक येणार याचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. गेल्यावर्षी चव्हाण यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर काढलेला जनआक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला होता. यावेळीही मोर्चा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसची जोरात तयारी सुरू आहे.

शरद पवार सहभागी होणार असल्याने राष्ट्रवादीने मोर्चासाठी पूर्ण ताकद लावली आहे. यवतमाळहून काढलेल्या हल्लाबोल दिंडीयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीची रंगीत तालिमही झाली आहे.

First published: December 12, 2017, 9:04 AM IST

ताज्या बातम्या