उस्मानाबाद, 19 ऑक्टोबर : 'महाराष्ट्र मोठ्या संकटाला समोर जात आहे. काही ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज काढावे', असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
उस्मानाबादमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
'राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भागाची पाहणी करून कर्ज घेऊन लोकांना या संकटातून बाहेर काढावे. केंद्र सरकारनेही राज्याला मदत करण्याची गरज आहे' असंही पवार म्हणाले.
'काल मी पाहणी केली त्यानंतर केंद्राने मदत करावी असं म्हटलं होतं. पण, लगेच पाहणी करून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. पाहणी करावे लागते, पंचनामे करावे लागता सर्व माहिती रेकॉर्ड ठेवावी लागते. त्यानंतर मदतनिधीची घोषणा होत असते. किल्लारीमध्ये जेव्हा भूकंप आला होता. त्यावेळी सर्व स्तारातील लोकांनी मदत केली होती. भूकंप झाल्या झाल्या लगेच घरांची बांधणी करण्यात आली नव्हती, त्यामुळे सर्वांनी मदत करण्याची वेळ आहे', असंही पवार यांनी स्पष्ट केले.
'सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अनेक पिकं कुजली किंवा सडली आहे. दुष्काळाच्या काळात उसाची लागवड कमी झाली होती. पुढील वर्षी याची कारखाने लवकरच सुरू करावे लागणार आहे. उसाचे प्रचंड नुकसान झाले. ते नुकसान भरून काढता येणार नाही', असंही पवार म्हणाले.
नदी, ओढा शेजारी विहिरी घेतल्या, अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकल्या आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली. गाव पातळीवर रस्ते वाहून गेले आहे. पाण्याचा प्रवाह हा बदला आहे. पाण्यामुळे नदीतील माती वाहून गेली आहे. पिकं गेलं तर एका हंगामाच नुकसान पण पाण्यामुळे मातीच खरडून निघाली ते नुकसान जास्त धोकादायक आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असे चित्र आहे, अशी चिंताही पवारांनी व्यक्त केली.
त्यांच्याकडे कोणती जादू दिसत आहे. आले की लगेच प्रश्न सोडवतील. आमची विनंती आहे की, त्यांनी आम्हालाही थोडी जादू खासगीत शिकवावी. म्हणजे आम्हालाही त्यांची मदत होईल, असा टोलाही पवारांनी विरोधकांना लगावला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मदत करण्यासाठी आश्वासन दिले आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही राजकारणी एकमेकांची जी काही मदत घ्यायची ती घेतो. भूजमध्ये भूकंप आला होता. तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती.भाजपचे पंतप्रधान होते त्यांनी पक्ष न बघता मदत केली. देवेंद्र फडणवीस इथं येणार असतील तर स्वागतच आहे.आणखी कुणी काही करत असतील तर स्वागत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.