Home /News /maharashtra /

शरद पवार यांचा नवा 'सेफ प्लॅन'? गृहमंत्रिपदाच्या स्पर्धेत आता सर्वात विश्वासू माणूस पुढे

शरद पवार यांचा नवा 'सेफ प्लॅन'? गृहमंत्रिपदाच्या स्पर्धेत आता सर्वात विश्वासू माणूस पुढे

गृहखात्याची जबाबदारी राष्ट्रवादी कोणाकडे देणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली असून पुन्हा एक नवं नाव समोर आलं आहे.

    मुंबई, 21 मार्च : मुंबई पोलीस आयुक्तपदी राहिलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेण्यात आला तर गृहखात्याची जबाबदारी राष्ट्रवादी कोणाकडे देणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली असून काही नावे समोर आली आहेत. गृहमंत्रिपदासाठी (Home Minister Post) राष्ट्रवादीच्या गोटातून सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील या पदासाठी स्पर्धेत आले. मात्र गृहखात्यावरून राज्यात इतका मोठा गदारोळ झाला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ()NCP Sharad Pawar हे कोणतीही रिस्क घेणार नसल्याची माहिती समोर येत आहे. हेही वाचा - गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे उद्यापर्यंत घेतील, शरद पवारांनी केले स्पष्ट या पार्श्वभूमीवर गृहमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचं नाव पुढे आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बचावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत 'इंडिया टुडे'नं वृत्त दिलं आहे. महाविकास आघाडीची सत्ता येताना वळसे पाटलांची महत्त्वपूर्ण कामगिरी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, मात्र अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जात सर्वांनाच धक्का दिला. अजित पवार यांच्या मदतीने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार नंतर कोसळलं. परंतु तरीही महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करताना मोठी तारेवरची कसरत कारावी लागणार होती. यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि भाजपने घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले. यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. या सर्व पार्श्वभूमीवर कायमच संकटमोचक ठरलेले दिलीप वळसे पाटील हेच सध्या गृहमंत्रिपदासाठी योग्य पर्याय ठरू शकतील, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत निर्माण झाल्याचं मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Anil deshmukh, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या