मुंबई, 12 जून : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. पवार यांच्या या मॅरेथॉन बैठकांना 13 जूनपासून सुरुवात होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्थानिक समस्या, लोकसभेचं मतदान, विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार अशा विषयांवर मत जाणून घेणार घेतील, अशी माहिती आहे.
कोणत्या भागात कधी होणार बैठक?
कोकण - 13 जून
उत्तर महाराष्ट्र - 14 जून ,
पश्चिम महाराष्ट्र - 15 जून
विदर्भ - 21 जून
मराठवाडा - 23 जून
विधानसभा निवडणुकीत शरद पवार 'भाकरी' फिरवणार, जुन्यांची चिंता वाढली
'लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे नव्या चेहेऱ्यांना, नव्या रक्ताला संधी दिली पाहिजे, येत्या विधानसभा निवडणुकीत हा बदल करावा लागेल,' असं म्हणत शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षसंघटनेत बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
'नवीन पिढीला निवडणूक प्रक्रियेत संधी दिली पाहिजे. लोकांना बदल हवा आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. कष्टकरी तरूण चेहरांना संधी दिली पाहिजे. हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी,' अशी सूचनाही पवारांनी केली.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नव्या तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे. प्रस्थापित आणि गेली अनेक वर्ष सत्तेचा मलिदा खाणाऱ्या नेत्यांचा लोकांना कंटाळा आलाय. याची जाणीव शरद पवारांना झाली आहे. या नेत्यांवर लोकांचा राग असल्याने पक्षाची दुरावस्था झाली. त्यामुळे जुन्या नेत्यांना डावलून नव्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने जुन्या नेत्यांची चिंता वाढली आहे.
कार्यकर्त्यांनी राबायचं आणि नेत्यांच्या मुलांनी पदं घ्यायची असं सगळ्याच राजकीय पक्षात सुरू आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते दुखावले जातात. याचा फटका सर्वच विरोधी पक्षांना बसल्याने शरद पवारांनी नवी योजना आखल्याचं बोललं जात आहे.
VIDEO : रोहित पवारांचा कुणावर वार, भाकरी की पीठ बदलणार?