'सरसकट कर्जमाफी, सरसकट ओला दुष्काळ आणि सरसकट पवार हे राज्याचे मुख्यमंत्री'

'सरसकट कर्जमाफी, सरसकट ओला दुष्काळ आणि सरसकट पवार हे राज्याचे मुख्यमंत्री'

भाजप-शिवसेना यांचा मुख्यमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे ना भाजप ना सेना थेट शरद पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी करत काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलढाणा, 06 नोव्हेंबर : भाजप शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून कुरघोडी सुरू असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये शरद पवार यांना मुख्यमंत्री करा असे फलक काँग्रेसकडून लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेस स्पष्ट बहुमत कुठल्याही एका पक्षाला मिळालेलं नाही. अशा वेळेस भाजप-शिवसेना यांचा मुख्यमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे ना भाजप ना सेना थेट शरद पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी करत काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेच्या या वादात पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या बॅनरमुळे शहरात चर्चेचा विषय रंगला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी शरद पवार यांना मुख्यमंत्री होणार का असा सवाल माध्यमांकडून विचारण्यात आला होता. तुम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहात का? असा प्रश्न विचारला त्यावर पवारांनी नाही असं उत्तर दिलं. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यातले मतभेद वाढलेच तर महाराष्ट्रात मोठी राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे.

याआधीच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पवारांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मांडला होता. राज्यात पवार पुन्हा परत येतील अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात अशीही शक्यता व्यक्त  केली जातेय. शरद पवारांनीही राज्यात काय होऊ शकते यावर कुठलीही शक्यता फेटाळली नाही. त्यामुळे सत्ता समिकरणाचं गूढ वाढलं आहे.

राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर बोलण्यासारख काही नाही अशी मिश्किल टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. जनतेने युतीला कौल दिला आहे त्यामुळे भाजप -शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि राज्यातील अस्थैर्य दूर करावे, असे पवारांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बसणार असल्याचे पवारांनी सांगितले. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू असे देखील पवार म्हणाले.

आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. त्याच बरोबर सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोनवरून चर्चा केली होती. सकाळपासूनच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. संजय राऊत यांच्या भेटीबद्दल बोलताना पवारांनी सांगितले की, राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. राज्यसभेच्या आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा झाली. तसेच आज सकाळी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या भेटीसंदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा असे पवार म्हणाले. पण गडकरी यांची भेट ही रस्ते आणि विकासासाठी असते असेही पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या