उस्मानाबाद, 19 ऑक्टोबर : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रासमोर अतिवृष्टीचे संकट उभे ठाकले आहे. उस्मानाबादेतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले आहे. पण, आज दुसऱ्या दिवशीचा दौरा त्यांनी रद्द केला आहे.
शरद पवार यांनी आजचा दौरा रद्द केला आहे. रविवारी परांड्यात झालेल्या पावसामुळे हेलिपॅड खराब झाले आहे. त्यामुळे तिथे हेलिकॉप्टर उतरण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा दौरा पवारांना करता येणार नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचा दौरा हा रद्द करण्यात आला असून शरद पवार हे बारामतीला रवाना झाले आहे. तसंच, पुन्हा राहिलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासनही पवार यांनी दिले आहे.
त्यापूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उस्मानाबादेतील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीबद्दल माहिती दिली. 'महाराष्ट्र मोठ्या संकटाला समोर जात आहे. काही ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भागाची पाहणी करून कर्ज घेऊन लोकांना या संकटातून बाहेर काढावे' असं पवार म्हणाले.
'पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मदत करण्यासाठी आश्वासन दिले आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही राजकारणी एकमेकांची जी काही मदत घ्यायची ती घेतो. भूजमध्ये भूकंप आला होता. तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. भाजपचे पंतप्रधान असताना त्यांनी पक्ष न बघता मदत केली होती. देवेंद्र फडणवीस इथं येणार असतील तर स्वागतच आहे.आणखी कुणी काही करत असतील तर स्वागत आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले.
'एकनाथ खडसेंना निर्णय घ्यावा लागेल'
'एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे. गेली 25 वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. पण, दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांना त्याबद्दल दु: ख वाटत असेल. त्यामुळे आपल्या कामाची जिथे नोंद घेतली तिथे जावे वाटते का, असा विचार करत असतील. पण, त्यांना आमच्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काही करता येणार नाही' असं सूचक विधानही पवारांनी केले.
राज्यपालांना टोला
'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जी भाषा वापरली, त्याबद्दल अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी तशी भाषा वापरायला नको होती. मी आजपर्यंत अनेक राज्यपाल पाहिले. सत्तेत असताना अनेक राज्यपालांशी संबंधही आला. पण, असे भाष्य करण्याचे धाडस कुणी केले नाही. राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ही प्रतिष्ठा राखायला हवी, राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असं सूचक विधान पवार यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.