Home /News /maharashtra /

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शरद पवार म्हणतात....

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शरद पवार म्हणतात....

महाविकास आघाडीवर कोसळलेलं संकट पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

    मुंबई, 26 जून : महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) कोसळलेलं संकट पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू होणार की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सुरुवातीला आपल्याला त्याबाबत माहिती नसल्याचं उत्तर दिलं. तसेच राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता कमी आहे, असं विधान त्यांनी केलं. पण राष्ट्रपती राजवट लागणारच नाही, असं ते म्हणाले नाहीत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी आणखी कुठपर्यंत जातील, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कोरानाची लागण झाली होती. पण आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज होताच ते भाजपसाठी कामाला लागल्याचं चित्र आहे. त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची तुमची जबाबदारी आहे, असं सांगितलं आहे. या सगळ्या घडामोडींवर शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. "शिवसेनेचा गट हा आसाममध्ये गेला आहे. सत्ता परिवर्तनाचा हा प्रयोग आहे. पण शिवेसेनेला मदत करणारे सरकारमधील सर्व पक्ष हे त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आजच्या आघाडीला आमचा पाठिंबा आहे", असं शरद पवार म्हणाले. "एकनाथ शिंदे सांगतात त्यांच्याकडे संख्या आहे, तर मग ते गुवाहाटीमध्ये का थांबले आहेत? जर अडीच वर्षे सोबत होते तर आता का तक्रारी करत आहेत?", असे प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केले. (प्रत्येक बाथरुममध्ये पाच पोलीस, शिवसेनेचे बंडखोर गुवाहाटीत कैदी झाले : आदित्य ठाकरे) दरम्यान, "त्यांची जर मॅच फिक्सिंग असेल तरी शिवसेना प्रयत्न करत आहे. त्यांच्यावर आज किंवा उद्या काही कारवाई होण्याची शक्यता आहे. 16 किंवा 14 आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे", अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच "या लढाईत उद्धव ठाकरे यांचा विजय होईल. ते त्यांच्या कामातून, पक्षाच्या चौकटीतून बंडखोर आमदारांशी संवाद साधत आहेत. बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर त्यांची भूमिका बदलेल", असं शरद पवार म्हणाले. यावेळी बंडखोर आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत नवं सरकार स्थापन केलं किंवा बंडखोर आमदारांच्या हातात शिवसेनेचं नेतृत्व गेलं तर? या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलं. "मला जी शिवसेना माहिती आहे ती हे सहन करणार नाही. शिवसैनिकांची आपल्या संघटनेसाठी कष्ट करण्याची तयारी आहे. त्यांच्यात प्रचंड शक्ती आणि संघटन आहे. त्यामुळे जरी 40-50 आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तरी संघटनेवर काही परिणाम होणार नाही", असं शरद पवार म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, NCP, Sharad Pawar (Politician), Shiv sena

    पुढील बातम्या