Home /News /maharashtra /

'स्वर आज हरपले..', शरद पवार भावुक; शेअर केला लतादीदींसोबतचा फोटो, सुप्रिया सुळेंनीही वाहिली श्रद्धांजली

'स्वर आज हरपले..', शरद पवार भावुक; शेअर केला लतादीदींसोबतचा फोटो, सुप्रिया सुळेंनीही वाहिली श्रद्धांजली

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.

    मुंबई, 06 फेब्रुवारी: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. लतादीदींच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. (Veteran singer Lata Mangeshkar dies at 92) शरद पवार यांनी शेअर केला जुना फोटो शरद पवार यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतचा जुना फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली भारतीयांच्या भावविश्वात अढळस्थान मिळविलेल्या 'गानकोकिळा' अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. लतादिदी मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या.त्या बऱ्या होऊन परत येतील असा विश्वास होता. पण नियतीला हे मान्य नव्हते, असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे. ट्विट करुन सुप्रिया सुळेंनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. सुप्रिया सुळेंनी तीन ट्विट केलेत. त्यातील एका ट्विटमध्ये म्हटलं की. लतादिदींनी प्रदिर्घ काळ पार्श्वगायन केले.‌अनेक अजरामर गीते त्यांनी गायली आहेत.'मेरी आवाज ही मेरी पहचान है' हे त्यांनी गायलेले गीत त्यांची ओळख सांगण्यास पुरेसे आहे.त्यांना भारतरत्न आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार मिळाले. दोन वर्षांत घराबाहेरही पडल्या नव्हत्या लतादीदी जगभर पसरलेल्या कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे लतादीदी गेली दोन वर्षं घरातच होत्या. कुणाशीही त्यांची भेटगाठही झालेली नव्हती, तरीही त्यांना त्यांना या विषाणूने गाठलंच. निमित्त ठरलं घरातल्या एका मदतनीसाला झालेली कोरोनाची लागण. नोव्हेंबर 2019 पासून लतादीदी घराबाहेर पडलेल्या नाहीत. त्या घरीच आराम करत असत. त्या फार कुणाशी गाठभेटही घेत नसत. त्याच सुमारास त्यांना एकदा श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. त्या वेळी तब्बल 28 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्या आजारपणातून लतादीदी सुखरूप घरी आल्या. त्यानंतर जगभरात कोरोनाची साथ सुरू झाली आणि दीदींनी घरातच राहणं पसंत केलं. पहिल्या दोन लाटांमध्ये मंगेशकर कुटुंबीयांना त्रास झाला नाही. पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत कोरोनाच्या नव्या लाटेने अक्षरशः थैमान घातलं होतं. रुग्णसंख्या अक्षरशः शेकड्याने वाढत होती. त्याच वेळी मंगेशकर कुटुंबीयांच्या घरी काम करणाऱ्या स्टाफपैकी एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. घरगुती गोष्टी खरेदी करण्यासाठी घरातली नोकरमंडळी, मदतनीस, स्टाफ मेंबर्स बाहेर जात असतात, त्यापैकी एकीचा लता मंगेशकर यांच्याशी संपर्क आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसात त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेले 27 दिवस लतादीदींवर या रुग्णालयात उपचार सुरू होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Sharad Pawar (Politician), Supriya sule

    पुढील बातम्या