कन्हैय्या खंडेलवाल, हिंगोली 27 मे : हिंगोली जिल्ह्यात यावर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील 101 गावांपैकी तब्बल 50 गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. प्रशासन तात्पुरत्या योजना करत असले तरी हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात यावर्षी जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची तीव्रता वाढली होती. तालुक्यातील 101 गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींचे पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले असून 5 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
मार्च महिना सुरु झाल्यानंतर तालुक्यातील पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाझर तलाव, साठवण तलावासह सर्वच स्त्रोत आटल्याने विहिरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे 50 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने प्रशासनाने यातल्या फक्त दोन गावांचं अधिग्रहण केलं. तर १० गावांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयातं पडून आहेत. या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घ्या अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.
ग्रामस्थांना 3 ते 4 किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावं लागतंय. तीव्र पाणी टंचाईमुळे माणसांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या काही गावातले बोर अधिग्रहित करण्यात आले आहेत. तर काही गावात टँकर सुरु करण्यात आले आहेत. मात्र टँकरचे पाणी किती दिवस पुरणार असून कामाला जावं की टँकर ने पाणी भराव असा गावकऱ्यांनी केलाय.
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना जनावरांचा संभाळ करणेही कठीण झाले असून त्यांची दमछाक होत आहे. माणसाला प्यायला पाणी मिळत नाही तर प्राण्यांची व्यस्था कोण समजून घेणार असा सवालही ग्रामस्थांनी केलाय.