शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच रामराजेंना धक्का, भाजपची नवी खेळी

शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच रामराजेंना धक्का, भाजपची नवी खेळी

रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चा रंगत आहेत. पण अशातच रामराजेंना धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चा रंगत आहेत. पण अशातच रामराजेंना धक्का बसला आहे. कारण भाजपकडून रामराजे यांच्याविरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बजेट सादर करण्यात आलं. यावेळी अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. यात विधानपरिषदेत रामराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आला. तसंच रामराजेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतही भाष्य केलं.

भाजपने अविश्वास ठराव मांडल्यास रामराजे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक स्वराज्या संस्थांतील पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं आहे. अशावेळी रामराजे यांना विधानपरिषद सभापती म्हणून आपलं पद कायम राखणं कठीण होऊ शकतं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता आघाडीचे काही नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत नाराज असल्याचं दिसत आहे.

साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती आहे. तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचं शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना विशेष यश आलं नाही. कारण या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर रामराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले आहेत.

SPECIAL REPORT : बाईक चालवण्यासाठी ठेवला ड्रायव्हर, इतका मिळतो पगार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2019 09:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading