सुमित सोनवणे, दौंड, 17 जानेवारी : अभिनेता आणि दिग्दर्शक मांजरेकरांनी केलेल्या कथित शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप करणारे कैलास सातपुते हे कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर यवत इथं महेश मांजरेकर यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातानंतर ज्या व्यक्तीची गाडी मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून धडकली होती, त्या व्यक्तीने गंभीर आरोप केले आहेत. 'माझं खानदान कधी दारू पीत नाही, तर मांजरेकरांनीच दारूव्यतिरिक्त अंमली पदार्थाचे सेवन केले होते क़ाय? याचा तपास पोलिसांनी करावा,' अशी मागणी कैलास सातपुते यांनी केली असून यासंदर्भात ते कोर्टात जाणार आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला ब्रिझ्झा या चारचाकी गाडीचा पाठीमागून धक्का लागल्याने मांजरेकर यांनी आपल्याला शिवीगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते नावाच्या व्यक्तीने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत पोलिसांकडे दिली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलीस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महेश मांजरेकर यांनी दारु पिऊन आपल्याला मारहाण केली, असं तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील तक्रादार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्रसंग शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पुणे - सोलापूर महामार्गावर घडला. 'माझ्या पुढे असलेल्या महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारला अचानक ब्रेक लावल्याने माझी कार त्यांच्या कारला पाठीमागून धडकली. त्यानंतर गाडीतून उतरुन महेश मांजरेकर यांनी तू दारु पिऊन गाडी चालवतोस का? असं म्हणत आपल्याला चापट मारली असं तक्रारदाराने तक्रारीत यवत पोलिसांना सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.