भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका

भाजप प्रवेशाच्या तयारीत असेल्या आमदार शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 08:44 AM IST

भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका

सागर सुरवसे, माढा, 23 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतराचे वारे अतिवेगाने वाहत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या गोटात दाखल होत आहेत. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. पण भाजप प्रवेशाच्या तयारीत असेल्या आमदार शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे.

मागील 25 वर्षे सत्तेवर राहिलेले आमदार बबनराव शिंदे सत्तेविना बेचैन झाले आहेत. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे वारे वाहत आहे. त्यामुळे ते अडचणीच्या काळात भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र विधानसभेला ते भाजपकडून उभे राहिले तरी त्यांना पराभूत करू, असा इशारा युतीत सामील असलेल्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनी दिला आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी आमदार बबनराव शिंदेंवर जोरदार तोफ डागली. 'माढ्याची जागा ही शिवसेनेची आहे. आम्ही ती कोणत्याही स्थितीत भाजपला सोडणार नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही याची कल्पना देण्यासाठीच हा मेळावा घेतला आहे. आमदार शिंदे यांना पायउतार करण्याची हीच वेळ आहे. शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम आम्ही केले आहे. आम्हाला अपयश आले तरीही घराघरात शिवसेना पोहोचवली. लोकसभा निवडणुकीत एकजुटीने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेत लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पुनरावृत्ती घडवून शिंदेंना पराभव चाखायला लावण्याची हीच वेळ आहे,' असं म्हणत शिवसेनेच्या प्रा. शिवाजी सावंत यांनी कोणत्याही परिस्थितीत शिंदेंचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान, सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू असतानाच दोन्ही शिंदे बंधूंनी पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत न करता त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेले संजयमामा यांनी 11 लाख तर माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी 10 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्तता निधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सुपूर्द केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: पूरग्रस्तांसाठी सांगली-कोल्हापुर मध्ये तळ ठोकून असताना शिंदे बंधूंनी मुख्यमंत्राकडे जाऊन मदतनिधी देण्याचा मार्ग स्वीकारल्याने ही तर विधानसभेची पूर्वतयारी असल्याचे बोलले जात आहे.

Loading...

लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही शिंदे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्येही आमदार बबनदादा शिंदे गैरहजर होते. तेव्हापासूनच बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर आता मदतनिधीचं निमित्त साधत दोन्ही शिंदे बंधूंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीतील हे दोन नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला आणखीनच जोर मिळाला आहे.

SPECIAL REPORT : अजित पवारांनी हाती घेतला 'राज ठाकरे पॅटर्न'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 08:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...