नंदुरबार, 29 मार्च: लोकसभा निवडणूक आमच्या कुटुंबासाठी महत्त्वाची होती. आम्ही निवडणूक लढवली नाही आणि जिंकलो नाही तर आमची राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी केले आहे.
काँग्रेसने यंदा नंदुरबारमधून के.सी.पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. माणिकराव यांनी यावेळी पुत्र भरत यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने पाडवी यांनी संधी दिल्याने माणिकराव नाराज झाले आहेत. काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने आम्ही निराश झाल्याचे भरत यांनी एएनाय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
भरत गावित हे चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. तसेच ते अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. यामुळेच यंदा काँग्रेसकडून त्यांना उमेदारी दिली जाईल अशी आशा होती. दरम्यान, पुत्राला उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले माणिकराव काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे रहायचे का यासंदर्भातील निर्णय माणिकराव उद्या घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेल्या माणिकरावांच्या बंडाचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशातच माणिकरावांनी जर पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यास मतदारसंघातील निकालाचे चित्र बदलू शकते.
VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..