शिवसेना NDA तून बाहेर पडणार, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत राजीनामा देणार

शिवसेना NDA तून बाहेर पडणार, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत राजीनामा देणार

शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं अरविंद सावंत यांनी ट्विट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आता आणखीन वाढला आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आपण असमर्थ असल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यांना सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं ट्विटरवरून सांगितलं.

राज्यात महायुतीने एकत्र निवडणुका लढवल्या पण निकालानंतर भाजप-सेनेमध्ये बिनसलं. शिवसेना मुख्यमत्रिपदावर ठाम राहिली तर भाजपने असं काही ठरलंच नाही म्हटलं. अखेर मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावाही करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील युती बिघडली असताना केंद्रात एनडीएसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे.

अरविंद सावंत यांनी आपण सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं. तसेच लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या संघर्षानंतर शिवसेनेने भाजपसोबत जाण्याचं टाळलं आहे. त्यामुळे बहुमताचा 145 हा जादुई आकडा जुळवता न आल्याने भाजपनेही सत्तास्थापना करण्यास नकार दिला आहे. 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत देत जनादेश मिळाला. त्यामुळे राज्यपालांनी नव्यानं सत्ता स्थापन करण्यास आम्हाला सांगितले. मात्र असे असले तरी शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत आली नाही. त्यामुळे आम्ही आता सत्ता स्थापन करणार नाही,' अशी मोठी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली.

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर दुसरा मोठा पक्ष असलेली शिवसेना सत्तेवर दावा करण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना चंद्राकांत पाटील म्हणाले की, 'जनादेशाचा अपमान करून सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा.'

VIDEO : सत्तास्थापनेतील संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

Published by: Kranti Kanetkar
First published: November 11, 2019, 8:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading