पुणे, 16 ऑक्टोबर: पुण्यात सेल्फी काढण्याचा मोह 2 तरुणांच्या जीवावर बेतला. सेल्फी काढताना तोल जाऊन दोन्ही तरुण पुण्यातील भिडे पुलावरुन मुठा नदीत पडले आणि पुरात वाहून गेले. ओम तुपधर (वय-17) आणि सौरभ कांबळे (वय- 20, दोघे रा. ताडीवाला रोड) अशी पुरात वाहून गेलेल्या तरुणांची नावं आहेत.
ताडीवाला परिसरात राहणारे दोघे डेक्कनला नवरात्र, दसरा सणासाठी कपडे खरेदीसाठी आले होते. भिडे पुलावर फोटो काढण्यासाठी एक जण थांबला असता पाण्याचा प्रवाह वाढला. मित्र वाहत आसताना वाचवायाला गेलेला तरुणही गेला वाहून गेला. अग्निशमन दलाकडून दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
हेही वाचा...जळगाव हत्याकांडाला धक्कादायक वळण! अल्पवयीन मुलीवर झाला होता बलात्कार
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. ओम हा भिडे पुलावर सेल्फी काढत होता. ओम तोल जावून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी सौरभनेही पाण्यात उडी घेतली मात्र तोही वाहून गेला. तिसऱ्या मित्राने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील 3 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण बेपत्ता आहे.संपूर्ण पुण्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. एनडीआरएफचं 1 पथक बारामतीला पाचारण करण्यात आले आहे. जिल्ह्यात बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या 4 तालुक्यात मोठं नुकसान झाले आहे. 925 कुटुंबातील 3000 नागरिकांना स्थलांरीत करण्यात आले आहे.
बारामतीमधील कसबा, खंडोबनगर, पंचशील, साठेनगर, मळत मधील 2 हजार तर इंदापूर तालुक्यातील न्हावी, सणसर, लासुरणे, निमगाव केतकी, नीरा नरसिंग पूर भागातील 1 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील 100 पैकी 68 मंडळांमध्ये 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला. दौंड तालुक्यातील चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर 1 परिचरिका छतावर अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्यांची सुटका केली.
तर, दौंडमध्ये राजेगाव-खानोटा रस्त्यावर ओढ्याला आलेल्या पुरात 3 जण वाहून गेले आहे. शहाजी गंगाधर लोखंडे (वय 52), आप्पासाहेब हरिश्चंद्र धायतोंडे (वय 55), कलावती अप्पासाहेब धायतोंडे (वय 52) मृत्यमुखी पडले तर 1 जण बेपत्ता आहे.
पंढरपुरात 8 हजार लोकांचे स्थलांतर
दरम्यान, पंढरपुरात सखल भागानंतर पुराचे पाणी वाढत जाऊन गाव भागात आले आहे. उजनी धरण व्यवस्थापन कडून 3 लाख 50 हजार इतका विसर्ग वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पंढरपुरात भीमा नदी 2 लाख 70 हजार क्युसेकचा विसर्ग घेऊन वाहत आहे. घोंगडे गल्ली, भजनदास चौक, माहेश्वरी धर्मशाळा परिसरात पाणी आले आहे. प्रशासनाकडून शहर व तालुक्यातील 8 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू
परतीच्या पावसाचा नाशिकच्या ग्रामीण भागात धुमाकूळ सुरूच असून मनमाड, नांदगाव पाठोपाठ चांदवड, बागलाण तालुक्याला ही मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. दोन्ही तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे मका, बाजरी, कांदे, कापूस यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले तर चांदवडच्या सोनेसांगवी येथे शेतात काम करीत असतांना अंगावर वीज पडून रंगनाथ ठाकरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune