कपिल भास्कर, 18 मे : मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना बघता, शाळेतील मुलींना सक्षम करण्यासाठी नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतलाय. शहरातील महानगर पालिकेच्या शाळेतील मुलींना कराटे, बॉक्सिंगच्या माध्यमातून मोफत स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहे.
एका कळीचं फुलात रूपांतर होत असताना अनेक काटे तिच्या वाटेत येत असतात. अनेक काटे तिला बोचतात आणि तिची अवहेलना होत असते.अनेक जणी लहान वयातच लैंगिक छळाला बळी पडतात आणि हा लैंगिक छळ बऱ्याचदा घरातल्या नातेवाईकांकडून होतो तर बाहेरचेही या लहानग्यांचा छळ करायला मागे पुढे पाहात नाहीत.
पण या सगळ्याला आळा घालण्यासाठी मुलींनी सक्षम होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतलाय. महिला पोलिसांच्या मार्फत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासोबतच स्वसंरक्षणाचे मोफत धडे दिले जातायत. पालिकेच्या 27 शाळांमधील 2 हजार 500 मुलींना स्वरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
नाशिकमध्येच नाही तर सध्या देशभरात महिलांवरच्या अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना खूप जास्त वाढताना दिसतायत.त्यामुळे अगदी लहान वयापासूनच या मुलींना अशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं तर या मुली कोणत्याही मोठ्या संकटाला सामोऱ्या जाऊ शकतात. तसंच आर्थिक परिस्थितीनं दुर्बल असलेल्या मुली प्रायव्हेट क्लासला जाऊ शकत नाहीत त्याही इथे प्रशिक्षण घेऊ शकतायत. या प्रशिक्षणाबद्दल या विद्यार्थिनी फारच उत्साही आणि समाधानी आहेत.
नाशिक पोलिसांसोबतच नन्ही-कली फाऊंडेशन आणि महानगर पालिकेकडून सुरू असलेल्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. तर या उपक्रमामुळे मुलींची भावी पिढी ही सक्षम होईल यात काही वाद नाही. तसंच मुलींमधील भीती जाऊन कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद या मुलींमध्ये येईल एवढं मात्र निश्चित.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Self defence training, नाशिक, शाळा, स्वसंरक्षण