सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? 'हा' नेता सर्वात आघाडीवर

सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? 'हा' नेता सर्वात आघाडीवर

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार इथंपासून ते नक्की कुणाची सत्ता येणार, यावर सट्टाबाजारात शेकडो कोटींचा सट्टा लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मात्र अजूनही नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबतचा संभ्रम दूर झालेला नाही. त्यामुळे सट्टाबाजारतही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार इथंपासून ते नक्की कुणाची सत्ता येणार, यावर सट्टाबाजारात शेकडो कोटींचा सट्टा लागला आहे.

जे घडण्याची शक्यता अधिक असते त्यावर सट्टाबाजारात सर्वात कमी दर लावण्यात येतो. सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. महाशिवआघाडीसाठी सट्टाबाजारात 35 पैशांचा दर निश्चित करण्यात आला आहे. तर भाजपची सत्ता येईल या अंदाजावर तब्बल 6 रुपयांचा दर लावण्यात आला आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला आहे सट्टाबाजाराची पसंती?

सट्टाबाजाराने मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर 65 पैसे, एकनाथ शिंदे यांच्यावर 2 रुपये, आदित्य ठाकरे यांच्यावर 6 रुपये आणि अशोक चव्हाण यांच्यावरही 6 रुपयांचा दर लावण्यात आला आहे. तर सट्टाबाजारानुसार भाजपचा कोणताही नेता आता स्पर्धेत नाही.

निकालानंतर वेगळं होतं सट्टाबाजारातील गणितं

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीत जनतेनं कोणत्याही एका पक्षाला कल दिला नसला तरीही भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन पक्षांत संघर्ष निर्माण झाल्यानंतर ही युती तुटली. मात्र जेव्हा निकाल लागला तेव्हा सट्टाबाजारातील स्थिती वेगळी होती.

निकालानंतर मुख्यमंत्रिपदासाठी सट्टाबाजाराने भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती दर्शवली होती. तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 30 पैसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावरही 30 पैसे तर काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यावर 2 रुपयांचा सट्टा लागला होता. मात्र शिवसेनेनं वेगळी वाट धरल्याने हे सर्व अंदाज चुकले.

VIDEO: सत्ता स्थापनेवरुन शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ, पाहा काय म्हणाले

Published by: Akshay Shitole
First published: November 19, 2019, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading