सातारा, 28 ऑक्टोबर : सातारा-लातूर या महामार्ग रस्त्याचे नव्याने काम झाले असून पूर्वीच्या रस्त्यापेक्षा आता उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहून आलेले पाणी रस्त्यालगतच्या शेतात साचून राहिले असल्याने लगतची शेती पाण्याखाली जात आहे. पाण्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. महामार्गाच्या कामावेळी रस्त्यालगतच्या शेतजमिनींचा कसलाच विचार केला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सातारा-लातूर हा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा महामार्ग सातारा, कोरेगाव, खटाव, माण तालुक्यातून जातो. याआधीच्या रस्त्याची उंची नव्हती त्यामुळे शेजारील शेतजमिनीतील पाण्याचा निचरा होत होता. मात्र, आता नवीन रस्त्याची उंची वाढल्याने पाणी आडून राहत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने महामार्गालगतच्या शेतजमिनीत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहात आहे. उभी पिके कुजून गेल्याने शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच नव्याने पीक पेरणी करण्यासाठी देखील अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून तयार होणाऱ्या महामार्गामुळे नेमका कुणाचा उद्धार होणार आहे, असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत.
पाण्याने शेतजमिनींची प्रत खालावली
दळणवळणाची सुधारणा करून देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी गेल्या काही वर्षात सर्वत्र महामार्गाच्या माध्यमातून शहरे जोडण्याचे काम सुरू आहे. रस्त्यालगतच्या शेतजमिनीत साचणारे पावसाचे पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्ग महामार्गामुळे बंद झाले आहेत. परिणामी, या शेतजमिनीत नेहमीपेक्षा जास्त पाणी दीर्घ काळासाठी साचून राहिले. पाणी साचल्याने या शेतजमिनींची प्रत खालावली असून त्या कवडीमोल होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
Video: मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजलं, नौकाविहारासाठी वेण्णा लेकवर मोठी गर्दी
शेतकरी हतबल
माझी 3 एकर जमीन रस्त्यालगत आहे. रस्त्याची उंची भरावा करून दहा फुटाणे वाढवली गेली आहे. पण पाणी जाण्यासाठी ना पाईप टाकली, ना नाले काढले गेले. यामुळे पिक तसेच जमिनीचेही नुकसान होत आहे. आधी भूसंपादन न करताच रस्ता तयार करण्यात आला आता तर आहे हे क्षेत्र देखील पाण्याखाली गेले आहे. आम्ही करणार तर काय? नुकसान तर होतच आहे, असे शेतकरी विश्वास पवार, यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Satara, Satara news, शेतकरी, सातारा