सातारा, 15 ऑक्टोबर : वडिलोपार्जित जर्सी गाईचा दुधाचा व्यवसाय मात्र, या व्यवसायातून होणारा खर्च वजा जाता शिल्लक काहीच राहत नव्हते. त्यामुळे सातारा येथील तरुण शेतकरी सुहास जाधव यांनी गीरगाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू केला. जर्सी गाईच्या तुलनेत गीरगाईचा होणार खर्च अगदी कमी आहे. दुधालाही चांगला भाव आहे. त्यामुळे जाधव यांना व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न मिळत असून त्यांनी यशस्वी व्यवसायाचा आदर्श निर्माण केला आहे.
सुहास जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित जर्सी गाईच्या दुधाचा व्यवसाय होता. जरशी गाय पालनासाठी खुराक, मका, डॉक्टर, औषधे, कामगार अन्य खर्चीक बाबी बघता सगळा येणार दुधाचा पगार देखील खर्चात जाऊ लागला. त्यामुळे वडिलोपार्जित जरशी गाईचा व्यवसायच सुहासने बंद केला. शेतीच बरी म्हणत त्यांने शेती करण्यास सुरुवात केली.
माहिती घेऊन सुरू केला व्यवसाय
शेतीतून देखील उत्पन्नाचा मेळ न बसल्याने सुहासने नवीन व्यवसायाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. यातून त्यांने गीरगाईच्या दुधाचा व्यवसाय करण्याचे ठरवलं. सध्या सुहासकडे शेतात 10 गाई असून त्यातील 7 गाई दुभत्या आहेत. गाईंसाठी मुक्त संचार गोठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आमच्याकडील दुधाची गुणवत्ता उत्तम आहे. गोठ्याची साफसफाई चांगली आहे. ग्राहक देखील गोठ्यावर येऊन गाईंची पाहणी करतात. ग्राहकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे दुधाचा दर देखील ग्राहकच ठरवत असल्याचे सुहास सांगतो.
50 ते 55 लीटर दूधाचे संकलन
सध्या दिवसाला दोन वेळचे मिळून साधारण 50 ते 55 लीटर दूध संकलन होते. गाय व्यवसायासाठी 3 एकर क्षेत्र राखीव आहे. गेल्या वर्षभरापासून दुधाचे दर सातत्याने कमी होत असल्याने दुग्ध व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मात्र, तरीही आम्ही हा व्यवसाय तग धरून ठेवला आहे. सध्या प्रती लीटर 60 ते 70 रुपये असा दर मिळत आहे.
गीर गायीचा खर्च कमी
जनावरांच्या चारा, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापनाला अधिक प्राधान्य दिले जाते. यामुळे संभाव्य नुकसान टाळता येते. देशी गीरगाय आजारी पडण्याचे प्रमाण एकदम अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे खर्च कमी होतो. गायींसाठी 100 बाय 100 फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा बांधलेला आहे. गायींना अन्य वेळी बसण्यासाठी व दूध काढण्यासाठी बंदिस्तपणे 10 ते 60 फूट आकाराचे शेड बांधलेले आहे.
कामाचा दिनक्रम
सकाळी 5 वाजता व्यवस्थापनाला सुरुवात होते. सुरुवातीला शेण बाजूला केले जाते. त्यानंतर दूध काढण्यासाठी साधारणपणे 1 तासाचा वेळ लागतो. त्यासाठी २× ५० फूट आकाराच्या दोन दावणी आहेत. दूध काढण्यासाठी मशीनचा वापर केला जात नाही. हाताने दूध काढले जाते. दूध काढण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. सकाळी 7 ते 7.30 आणि दुपारी 3 वाजता जनावरांना चारा दिला जातो. चाऱ्यासाठी एकावेळी गवत, मका, घास यांची कुटी करून एकत्रित दिली जाते. सरासरी प्रती गाय एक वेळ 15 किलो चाऱ्याची कुटी दिली जाते. सायंकाळी 3 वाजता मिक्स याच पद्धतीने चारा एकत्रित करून दिला जातो.
कशी होते स्वच्छता?
शेडमध्ये पाण्यासाठी 6×3 फुटाच्या एक दावण आहे. त्यामध्ये आपोआप पाणी भरले जाते. 4 दिवसातून गोठ्यातील शेड धुऊन काढले जाते. गोठ्यातील शेण दररोज काढून त्याची साठवण केली जाते. दर महिन्याला साधारणपणे 2 ते 3 ट्रॉली शेण साठते. मुक्तसंचार गोठा पद्धत असल्याने गायींना धुण्याची गरज भासत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Satara, Satara news