सातारा, 05 डिसेंबर : 'थोडं थांबण्याची तयारी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असली पाहिजे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, माझं काही ऐकलं नाही, माझ्या काही गोष्टी केल्या नाही तेव्हा अशा दबाव टाकण्याच्या भूमिका घेतल्या जात असतात', असा टोला भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना लगावला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे उदयनराजे यांनी नुकतेच रायगडावर आक्रोश सभा घेतली होती. त्यावरून आज शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना खोचक सल्ला दिला आहे.
'त्यांनी कोणती दिशा धरली आहे. ते त्यांना माहिती आहे. मला काही त्याबद्दल माहिती नाही. पण आम्ही जिथे आहोत, तिथे समाधानी आहोत आणि प्रामाणिक आहे. मागे सुद्धा जिथे होतो तिथे समाधानी होतो. आपलं काही राजकीय साध्य होत नाही म्हणून राजकीय दबाव आणण्याचे काम होत असते, आपल्याकडून असं राजकारण झालं नाही. थोडं थांबण्याची तयारी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असली पाहिजे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, माझं काही ऐकलं नाही, माझ्या काही गोष्टी केल्या नाही तेव्हा अशा दबाव टाकण्याच्या भूमिका घेतल्या जात असतात, त्याबद्दल मला माहिती नाही. ही त्यांच्या राजकारणाची पद्धत असू शकते, याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे', असा टोलाही शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लगावला.
(कर्नाटकच्या वेशीवर असलेल्या 'त्या' 40 गावांसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा, उदय सामंत म्हणाले...)
उदयनराजे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी वक्तव्य केलं त्यांचा निषेध केला आहे. आम्हाला खात्री आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आता त्यांना विश्वास राहिला नसेल तर मी काही सांगू शकत नाही, असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला.
(जरा तरी लाज ठेवा; प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संभाजीराजे संतापले)
'या आंदोलनामागे काही राजकीय विषय आहे का, राजकीय स्वार्थ आहे का, याची माहिती घेतली पाहिजे. आंदोलन नक्की करावे, पण विषय कुठे आहे. राज्यपाल जर बदलायचे असेल तर दिल्लीमध्ये आंदोलन करावे लागेल. यासाठी दिल्लीत जावे लागणार आहे. इथं तुम्ही महाराष्ट्रात बसून दंगा करून काय होणारं आहे. दिल्लीत जाऊन आंदोलन करून राज्यपालांना बदलून टाकावे. तुम्हाला कुणी अडवलं आहे, असा सल्लावजा टोलाही शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news