सातारा, 24 डिसेंबर : आज पहाटे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी पुलावरून तीस फूट खोल खड्ड्यात कोसळली. ज्या वाहनाचा अपघात झाला त्या वाहनामध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण परिसरात हा अपघात झाला. सध्या जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र दुसरीकडे जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले असून, हा अपघात आहे की घातपात अशी शंका येत असल्याचं म्हटलं आहे. आता यावर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे.
पहाटेच्या डुलकीमुळे अपघात
जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या शंकेबद्दल खासदार निंबाळकर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. मी थोड्या वेळापूर्वी आमदार गोरेंच्या वडिलांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली, मला यामध्ये घातपाताची सुतराम शक्यता वाटत नसल्याचं रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटलं आहे. मी अपघात झाल्यानंतर 5 ते 6 मिनिटांत त्या ठिकाणी पोहचलो होतो. चालक शुद्धीवर होता. त्याला डुलकी लागल्याच्या पलिकडे काही निदर्शनास आलं नाही. चालक शुद्धीवर आल्यानंतर त्याचे स्टेटमेंट देईल, पण आज तरी मी खात्रीशीर सांगू शकतो की पहाटेच्या डुलकीमुळे हा अपघात झाला. आता जयकुमार गोरे यांची प्रकृती उत्तम आहे असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात? वडिलांचं खळबळजनक वक्तव्य
गोरे यांच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलं?
आमदार जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. रोडवर एवढी वर्दळ नव्हती. रस्ता देखील अपघात होण्यासारखा नाही. त्यामुळे मला या अपघाताबाबत शंका येत असल्याचं गोरे यांच्या वडिलांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Satara, Satara news