सातारा, 01 डिसेंबर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाची लालपरी रात्रंदिवस धावत असते. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी अनेक मुक्कामी गाड्या असतात. रात्री थंडीत कुडकुडत चालक, वाहकांना गाडी घेऊन जावे लागते. पण मुक्कामाच्या ठिकाणी कसलीच सोय होत नाही. त्यामुळे एसटीतच कुडकुडत झोपावे लागते. दिवसभर सेवा द्यायची आणि रात्रही कुडकुडत गाडीतच घालवायची अशी वेळ चालक, वाहकांवर आलेली आहे.
नागरिकांना वेळेत इच्छित स्थळी पोहचता यावे, सकाळी शहराच्या ठिकाणी जाणे सोपे व्हावे, विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून मुक्कामी एसटीची मागणी केली जाते. मात्र, चालक- वाहकांच्या मुक्कामाची सोय होते का, याची कोणीच पाहणी करत नाही. त्यामुळे चालक, वाहकांना गैरसोय सहन करावी लागते. अशा परिस्थिती जर एखाद्या दुसऱ्या दिवशी बस गेली नाही तर मोर्चा, आंदोलन, निवेदन लगेच तयारच असतात. पण आमच्या सोईकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे कर्मचारी सांगतात. सातारा जिल्ह्यातील अनेक गावे दुर्गम आहेत. त्याठिकाणी मुक्कामी गाडी घेऊन जायचे म्हटले तर अंगावर काटा येतो. अशा ठिकाणी रात्र घालवणे मोठा प्रश्न असतो. त्यात सुविधा मिळत नाही.
ग्रामपंचायतीने व्यवस्था करणे गरजेचे
चालक, वाहक यांच्या मुक्कामाची सोय करणे ही जबाबदारी तेथील ग्रामपंचायतीची असते. साताऱ्याचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनीही यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार केले होते. पण स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे वाहतूक निरीक्षक राजाराम वाघमारे, यांनी सांगितले.
एसटीतच रात्र काढावी लागते
मोठ्या बसस्थानकात चालक-वाहकांसाठी विश्रामगृह असते. मात्र तेथे प्रचंड अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे तेथे डासांचा त्रास होतो. ग्रामीण भागात बसस्थानक भोवती प्रचंड गवत उगवलेले असते. त्यामुळे चालक- वाहकांना अनेकदा एसटीत रात्र काढावी लागते. तर वाड्या वस्त्यांवर मंदिरात, तर कधी झाडाचा आधार घेऊन रात्र काढावी लागत असल्याची व्यथा चालक, प्रतापराव काटकर यांनी सांगितली.
14 कोटींच्या जुन्या नोटांवर साचली धूळ, देखभाल करणारे कर्मचारी परेशान, Video
दररोज शेकडो गाड्या मुक्कामी
जिल्हा हा राज्याच्या बहुतांश जिल्ह्याशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे अनेक मंडळी देवदर्शनासाठी राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी जात असतात. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातून दररोज सरासरी दोनशे तरी गाड्या मुक्कामी जात असतात. सातारा आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांची संख्याही मोठी आहे. साताऱ्यातून पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, बीड, जालना, आदी महत्वाच्या ठिकाणी जात असतात. त्याचप्रमाणे साताऱ्यात अहमदनगर, जामखेड, नाशिक, श्रीगोंदा, बारामती यासह कर्नाटक राज्यातून गाड्या मुक्कामासाठी सातारा बसस्थानकात येत असतात. यातील बहुतांश गाड्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.