'उदयनराजेंसाठी निवडणूक जिंकणं कठीण', शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

'उदयनराजेंसाठी निवडणूक जिंकणं कठीण', शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आता पुन्हा एकदा निवडणूक झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर उदयनराजे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आता पुन्हा एकदा निवडणूक झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबत 21 ऑक्टोबर रोजी सातारा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यातून सहज विजय मिळवणाऱ्या उदयनराजेंसाठी यंदाची निवडणूक कठीण असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही याबाबतच भाष्य केलं आहे.

'लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत उदयनराजेंनी राजीनामा दिला. राजीनामा देऊन त्यांनी सातारच्या जनतेवर पुन्हा निवडणूक लादली आहे. याचा निश्चित परिणाम मतदानावर होणार आहे. अवघ्या 3 महिन्यांत असं काय झालं की त्यांचं ह्रदयपरिवर्तन झालं, असा प्रश्न लोकांना पडला असेल. त्यामुळे मी ही निवडणूक जिंकेलच असं उदयनराजे आज स्पष्टपणे सांगू शकणार नाही. त्यांच्यासाठी ही निवडणूक नक्कीच कठीण जाणार आहे,' असं म्हणत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंना विजय कठीण असल्याचं त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्याच नेत्याने भाकीत केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता उदयनराजे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावं लागेल.

उदयनराजेंसमोर आव्हान

यंदाची निवडणूक उदयनराजे भोसले यांच्यासाठी आव्हानात्मक असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यातच मतदानाची टक्केवारी समोर आल्यानंतर उदयनराजेंची डोकेदुखी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात 60 टक्के मतदान झालं होतं. मात्र आता पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी जवळपास 65 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

साताऱ्यातील हे वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार, यावर जय-पराजयाचं गणित ठरणार आहे. मात्र जेव्हा-जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो, तेव्हा हा वाढीव टक्का हा प्रस्थापित उमेदवारासाठी धोक्याची घंटा असल्याचं समजलं जातं. त्यामुळे वाढलेलं मतदान गेल्या तीन टर्मपासून सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार असलेल्या उदयनराजे यांच्या अडचणी वाढवणार का, अशी चर्चा रंगत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील दोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केला होता. यात शिवेंद्रसिह हे विधानसभा निवडणूक लढवत होते. तर उदयनराजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानं इथं लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिल्याने ही लढत रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 01:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading