ना सुभाष देशमुख ना रणजितसिंह...माढ्यासाठी भाजपकडून आता 'या' नावाचा विचार सुरू

ना सुभाष देशमुख ना रणजितसिंह...माढ्यासाठी भाजपकडून आता 'या' नावाचा विचार सुरू

सहकारमंत्री सुभाष देशमुखांसह भाजपकडून इतरही काही नावांची चाचपणी सुरू आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, माढा, 13 मार्च : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुखांसह भाजपकडून इतरही काही नावांची चाचपणी सुरू आहे. यातच आता भाजपकडून माढ्यात संजय शिंदे यांच्या नावाचाही विचार असल्याची माहिती आहे.

संजय शिंदे यांनी मंगवारी रात्री महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संजय शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास चर्चा केली आहे.

राष्ट्रवादीने जर प्रभाकर देशमुख किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली, तर सुभाष देशमुख किंवा संजय शिॅदे यांच्यापैकी एकाला मैदानात उतरवण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे. मात्र भाजपमध्ये अद्याप कोणत्याही नावावर एकमत झालेलं नाही.

रणजितसिंह मोहिते पाटील वेटिंगवर

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने आता वेटिंगवर ठेवल्याचं चित्र आहे. रणजित सिंह हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, मी वैयक्तिक कामासाठी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे, असा दावा रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला आहे.

रणजितसिंह भाजपच्या गोटात दाखल झाले तर हा राष्ट्रवादीसाठा मोठा धक्का असणार आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तरीही त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार असेल, तर राष्ट्रवादीची मोठी गोची होऊ शकते.

माढा लोकसभा मतदारसंघात कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

करमाळा

माढा

सांगोले

माळशिरस

फलटण

माण

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा राष्ट्रवादीसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 साली पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. तेव्हाही भाजपकडून त्यांच्याविरोधात सुभाष देशमुख हे मैदानात होते.

कुणाला किती मते मिळाली?

शरद पवार - 530,596

सुभाष देशमुख - 216,137

महादेव जानकर - 98,946

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी थेट निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत होते. मोदी लाटेचं मोठं आव्हान असतानाही या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 'विजय' खेचून आणला होता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दिलेली कडवी झुंजही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती.

कुणाला किती मते मिळाली?

विजयसिंह मोहिते पाटील - 489,989

सदाभाऊ खोत - 464,645

प्रतापसिंह मोहिते पाटील - 25,187

मतदार संख्या आणि स्वरूप

या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या 17 लाख 27 हजार 322 एवढी होती. यातील 10 लाख 80 हजार 167 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

पुरूष मतदारांचं प्रमाण : 52.84 टक्के

स्त्री मतदारांचं प्रमाण : 47.16 टक्के

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न

पाणी आणि रस्ते हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. या लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागाला कायमच दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. यंदाही हा भाग भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनावरे आणि शेतीसाठीच्या पाण्याशिवायच अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यांची स्थितीही बिकट असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याच प्रश्नांवर रान पेटण्याची शक्यता आहे.

काय आहे सध्याची राजकीय स्थिती?

या मतदारसंघात पुन्हा एकदा शरद पवारांनी एंट्री केल्याने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. पण त्यानंतर आता शरद पवारांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते पाटील हेच निवडणूक रिंगणात असतील. राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ कायमच अनुकूल राहिला आहे. तसंच विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबतही लोकांमध्ये काहीसं समाधाना आहे. पण तरीही ही लढत एकतर्फी नक्कीच असणार नाही. कारण त्यांच्याविरोधात उभे ठाकणारे भाजपचे संभाव्य उमेदवार सुभाष देशमुख हे आता मंत्रिपदावर आहेत. शिवाय भाजपची या मतदारसंघातील ताकद काही प्रमाणात वाढली असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप आता राष्ट्रवादीसमोर किती मोठं आव्हान उभं करतं हे पाहावं लागेल.

VIDEO: भीषण अपघात ! डिव्हायडरला धडकून कार हवेत उडाली, अन्...

First published: March 13, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading