मुंबई, 25 जानेवारी : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागेवर पोटनिवडणुका होणार आहेत. मात्र या पोटनिवडणुका बिनविरोध होणार की, महाविकास आघाडीकडून या जागेवर उमेदवार देण्यात येणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. या पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
नेमकं काय म्हटलं संजय राऊत यांनी?
एखाद्या आमदाराचं निधन झालं तर त्या जागेवरील उमेदवार बिनविरोध निवडला जावा ही पंरपरा आहे. मात्र अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली नाही. अंधेरीची निवडणूक ही मुंबईत होती. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यांची संधी भाजपला नव्हती. मात्र तरीही काल रात्री राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर आले होते, दोन्ही पोटनिवडणुकीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
चिंचवडच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही
उद्या पुन्हा या दोन जागांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. उमेदवारासंदर्भात या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. मात्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झालाच तर चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा अशी आमची भूमिका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काल आमची इतर सहकाऱ्यांसोबत देखील चर्चा झाली, मात्र निवडणूक लढायला काही हरकत नाही असाच सूर या बैठकीतून उमटला असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, NCP, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray