नाशिक, 08 जानेवारी : नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच, दोन्ही नेत्यांना आज संध्याकाळी जबाबदारी निश्चित केली जाईल, असंही राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनासोबतच ते घेऊन आले होते. पत्रकार परिषदेतच दोन्ही नेत्यांना भगवी शाल देऊन संजय राऊत यांनी पक्षात स्वागत केले आहे.
'वसंत गीते आणि सुनिल बागुल हे इथं माझ्यासोबत आले आहे, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. आता दोन्ही नेते मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. नाशिकचा बालेकिल्ला आता आणखी भक्कम केला जाणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
नाशकात हा काही मास्टर प्लॅन नव्हता. प्रवाह बदलत आहे. पुढे काय बदल होणार आहे ते वसंत गीते आणि बागुल सांगतील. पण, आता शोभा मगर, प्रकाश डायमा हे सेनेत प्रवेश करणार आहे. अनेक भाजपचे पदाधिकारी, प्रमुख नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, त्यांना शिवसेनेसोबत काम करायचे आहे. या दोन्ही नेत्यांपाठोपाठ भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहे, असंही राऊत यांनी सांगितले. तसंच 'पुढचा महापौर हा शिवसेनेचा असणार आहे', असंही राऊत यांनी ठामपणे सांगितले.
औरंगाबाद विमानतळ नाव बदलण्याचा ठराव कॅबिनेटनं मंजूर करून केंद्राला पाठवला. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ हा प्रस्ताव सरकारने दिला आहे. काँग्रेस मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक आहे. बिहार मधील औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर करावं अशी मागणी आहे. यावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी. किमान समान कार्यक्रमावर लोकभावनेवर निर्णय घ्यायचा नाही, असं नाही, असंही राऊत म्हणाले.
तसंच, माझ्यावर कोणताही घाव,वार, हल्ला याचा परिणाम होत नाही. नोटिसा म्हणजे सरकारी कागद आहे. आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल. ईडी आणि सीबीआय मागे लावण्याऱ्यांनी लक्ष्यात ठेवावं. मी विरोधी पक्षांचा सन्मान राखतो. प्रताप सरनाईक यांना वेगळा न्याय आणि गिरीश महाजन यांना वेगळा का? असा सवालही राऊत यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.