'शिवसेनेकडे जे लोक येत आहेत ते व्हाया भाजप येत आहेत'

'शिवसेनेकडे जे लोक येत आहेत ते व्हाया भाजप येत आहेत'

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नक्कीच एक वातावरण निर्माण केलंय. त्याला यश किती मिळेल हा पुढला प्रश्न.

  • Share this:

मुंबई, 02 मार्च : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय स्फोट घडविणारी मुलाखत दिली आहे. शंभर जाहीर सभांची ताकद असणारी ही मुलाखत म्हणजे 'सौ सोनार की आणि एक लोहार की' ठरल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या मनातील सर्वच प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत उत्तरे दिली.

'शिवसेना कधीच सत्तेसाठी लाचार झाली नाही. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची, देशाची गरज होती. देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा काय?' असा कडक सवाल त्यांनी टीकाकारांना केला.

वाचा संपूर्ण मुलाखत...

सध्या आपल्या भूमिकेकडे सगळय़ांचं लक्ष आहे. प्रश्न फार सोपा आणि साधा आहे… आता कसं वाटतंय… म्हणजे युती झाल्यावर…

शिवसेनेच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आजच नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्या वेळेपासून आहे. याचं कारण शिवसेनेची भूमिका ही केवळ सत्तेसाठी नसते तर ती देशासाठी आणि जनतेसाठी असते. सत्तेत असो अथवा नसो. शिवसेना सदैव जनतेसोबत राहिली आहे आणि यापुढेही राहील आणि म्हणूनच शिवसेना काय म्हणतेय, शिवसेना काय करते आहे… याकडे देशाचं लक्ष असतं…

 निवडणुकीच्या आधी आपली वेगळी भूमिका होती आणि आता आपण भूमिका बदलली आहे हे कसे?

निवडणुका जाहीर होण्याआधी मी एका वेगळय़ा भूमिकेत नक्कीच होतो. निवडणुका आता जाहीर झाल्यात, पण त्याआधी गेल्या दीड महिन्यापूर्वी एक वेगळी भूमिका शिवसेनेने घेतली… वेगळी भूमिका म्हणजे काय घेतली?…तर गेली चार वर्षं-पाच वर्षं शिवसेना सातत्याने जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडत आहे. राज्यात तर सोडाच, पण संपूर्ण देशात विरोधी पक्ष गलितगात्र होऊन पडले होते आणि जनतेचा आवाज कुणी उठवत नव्हतं, तेव्हा एकटी शिवसेना संपूर्ण देशात जनतेचा आवाज संसदेत बुलंदपणे उठवत होती… मला अभिमान आहे की शिवसेना सत्तेसमोर कधीही लाचार झाली नाही. ताठ मानेने उभी राहिली आणि जनतेचे प्रश्न मांडत राहिली. मग तुम्ही विचाराल, नेमकं असं काय झालं की आता आम्ही युती केली? सगळं जग साक्षी आहे त्याला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमितजी शहा हे एकदा नव्हे, तर दोन वेळा मला भेटायला आले. घरी आले आणि जेव्हा युतीचं नक्की ठरलं तेव्हा मी त्यांच्यासमोर जनतेचे प्रश्न मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी उपस्थित होते.

 जनतेचे प्रश्न आपण सत्तेमध्ये असतानाही मांडू शकत होता.

मांडतच होतो.

आपण सत्तेमध्ये होता… तेव्हा आपण सगळेच विरोधी पक्षाची भूमिका बजावत होतो. महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेमध्ये वाटेकरीही राहिला आहात… तेव्हाही हे प्रश्न मांडले जाऊ शकले असते…

VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

मांडलेच होते… तेव्हाही आमचे मंत्री कॅबिनेटमध्ये आणि आमदार विधिमंडळात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतच होते.

 आता ‘ब्रेक अप’नंतर नव्याने संसार सुरू झाला…

बरोबर आहे… 25 वर्षे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती ही हिंदुत्वाच्या आधारावर अतिशय घट्ट होती. अर्थात आम्ही ‘एनडीए’ म्हणून एकत्र होतो. जवळ जवळ 30 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचे एकहाती सरकार केंद्रामध्ये आले. हा चमत्कार होता. त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटलं असेल की, संपूर्ण देशात आपल्याला एकटय़ाने पुढे जाता येईल. काही निर्णय सरकार म्हणून त्यांनी घेतले त्यावर टीका झाली. एनडीएत असूनही आम्ही त्यावर बोलत राहिलो त्यात आमचा व्यक्तिगत स्वार्थ म्हणाल तर अजिबात नव्हता.

 त्या बोलण्याविषयी तुम्हाला आता खंत वाटतेय का?

अजिबात नाही.

 तुम्ही त्या वेळी जे बोललात, ते परखडपणे बोललात.

होय, परखडपणेच बोललो.

 कुणाची हिंमत होत नव्हती बोलण्याची, तेव्हा तुम्ही प्रश्न मांडलेत… आता तुम्हाला काय वाटतं?

मला त्याबद्दल अजिबात पश्चात्ताप होत नाही. मी जे मुद्दे मांडले ते भारतीय जनता पक्षाने आता स्वीकारले. शेतकऱ्यांचे प्रश्न होते, नाणारचा मुद्दा होता, राममंदिराचा मुद्दा होता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मुंबईकरांसाठी आणि ठाण्यासाठीसुद्धा. 500 फुटांपर्यंत ज्यांची घरे आहेत त्यांना मालमत्ता कर रद्द करणं… असा मुद्दा मुंबईत स्वीकारला आहे. जसे कर्जमाफी आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे… आज गावागावांमध्ये शेतकऱ्यांना तसा कुणी वाली नाही. योजना जाहीर झाल्या… मी काय केलं तर त्या योजनांचा पाठपुरावा केला. नवीन काही करायला सांगितलं नाही. उदाहरणार्थ इन्कम टॅक्सबद्दलची जी मागणी होती शिवसेनेची… मानली ना त्यांनी… सगळे मुद्दे आम्हीच मांडले, हिरीरीनं मांडले. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी उचलायला हवे होते ते मी जनतेच्या हितासाठी उचलले. ते मानले गेले, स्वीकारले गेले आणि त्यावर उपाययोजनासुद्धा सुरू झाली असेल तर मग संघर्ष कशासाठी करायचा?

 अचानक शिवसेनेची गरज का निर्माण झाली?

खरं तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता. पण मला एकूण असं वाटतं की, जी चर्चा आमच्यामध्ये झाली त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या होत्या, ज्याच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता तो दुरावा दूर करण्याचा प्रयत्न नक्की झाला. हिंदुत्वावर आम्ही तेव्हा युती केली होती. आजही हिंदुत्व हा धागा आहेच.

 तरीही युती तुटली… आणि पुन्हा एकत्र आलात.

धरून चला की या वेळी आम्ही वेगळे लढलो असतो तर कोण किती जिंकलं असतं याच्यापेक्षा कुणाचं किती नुकसान झालं असतं याचा विचार करायला हवा. विरोधी पक्षाच्या आघाडीकडे अजूनही जागावाटप नीट होत नाहीये. त्यांचा एक नेता ठरत नाहीये. राज्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटतंय की त्यांचं कोणी ऐकत नाही. शरद पवार एकदा लढायचं म्हणताहेत, एकदा लढायचं नाही म्हणताहेत. म्हणजेच कुठेही ना शेंडा ना बुडखा… ना आकार ना उकार. अशी विरोधी पक्षांची एक मोट जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या हातात देश द्यायचा काय?

 याआधी अशापद्धतीने मोट बांधण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत.

होय, असे प्रयत्न झाले असतील. आपण अनुभव घेतलेला आहे इंदिराजींच्या काळात. त्यांनी आणीबाणी लादली होती. आणीबाणी आणि तिची अंमलबजावणी ज्या तऱहेने, ज्या पद्धतीने झाली, जनतेमध्ये एक संताप होता आणि मग सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाचं सरकार आलं होतं. ते जेमतेम 22 महिने टिकलं असेल आणि ते पडलं… कोसळलं. त्या वेळेला तरी निदान जयप्रकाश नारायण होते. या वेळी तसा सगळय़ांना एकत्रित करेल असा एकही चेहरा संपूर्ण देशात दिसत नाही. समजा… धरून चला की विरोधी पक्षाकडे सत्ता गेली तर त्यांच्या कडबोळय़ात सगळय़ांनाच पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. म्हणजे त्याच्यावरून पुन्हा भांडणं होणार. आणि शेवटी मी जे म्हटलं ना की, ना शेंडा ना बुडखा… मग निदान आमच्यात हिंदुत्व हा एक समान मुद्दा तरी आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व. हे आमचं हिंदुत्व आहे आणि हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे आणि आता जर का आपण मागे गेलो तर या देशात हिंदू हा हिंदू म्हणून उभा राहणं केवळ कठीण होईल.

 लोकांच्या मनात एक मुख्य प्रश्न कायम असा आहे की, आपण शतप्रतिशत शिवसेना किंवा स्वबळाचा नारा दिला होता.

EXCLUSIVE : राजकारणात चारित्र्याबाबत आरोप झाल्यावर वेदना होतात? नवनीत राणांची मुलाखत

होय! नक्कीच. त्यात चुकलं काय?

 या तुमच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये एक झटका किंवा करंट लागला… त्या भूमिकेविषयी आता संभ्रम आहे…

संभ्रम कसला? या भूमिकेवर आम्ही ठामच आहोत. दरवेळेला आपण राजकीय पक्ष म्हटल्यानंतर केवळ निवडणुका आणि निवडणुकीचा निकाल एवढय़ापुरतंच त्याचं अस्तित्व धरतो. पण तसं नाही. शतप्रतिशत म्हणजे शंभर टक्के शिवसेना… याचा अर्थ माझ्या शिवसेनेचा विचार… माझ्या शिवसेनेची विचारधारा, जी शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे ती माझ्या राज्यातल्या खेडय़ापाडय़ात प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे, हे शंभर टक्के. निवडणूक हा एक अविभाज्य घटक आहे. राजकीय पक्ष म्हटलं की, दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका लढवाव्या लागतात, निवडणुका जिंकाव्या लागतात; पण विचारधारा पसरवणं, विचार रुजवणं याला शंभर टक्के मी मानतो. मी पूर्वी म्हटलं होतं की, युतीमध्ये आमची 25 वर्षे सडली.

 फार महत्त्वाचं स्टेटमेंट होतं हे… आमची 25 वर्षे युतीत सडली…

नक्कीच होतं…

 शिवसेना वाढवण्याची संधी गमावलीत पुन्हा युती करून, असं वाटत नाही का?

25 वर्षे सडली याचा अर्थ समजून घ्या. युती केल्यानंतर आम्ही गाफील राहिलो… शिवसेनाप्रमुखांनी त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. पण युती झाल्यानंतर आमच्यात थोडा गलथानपणा आला. तो जो काही गलथानपणा होता तो आता राहणार नाही. विचार पोहोचवणं, विचार पसरवणं हा काही गुन्हा नाही. याचा अर्थ असा नाही की, मी फक्त निवडणुकाच डोळय़ासमोर ठेवतो… शेवटी राष्ट्र उभं करणं, देश उभा करणं हे महत्त्वाचं आहे. ‘युती’ म्हणून माझ्या वाटय़ाला जेवढय़ा जागा आल्या आहेत तेवढय़ातच शिवसेना ठेवावी का? बाकी ठिकाणी शिवसेना न्यायची नाही का?…कारण शिवसेना हा केवळ पक्ष नाही, तर शिवसेना हा एक विचार आहे.

 2014 आणि 2019 ची परिस्थिती… यात तुम्ही आता काय फरक कराल?

2014 आणि 2019 च्या परिस्थितीमध्ये तसा फरक पडलेला नाही. कारण त्याही वेळेला विरोधी पक्षात तसं कुणी नव्हतं. याही वेळेला विरोधी पक्षात तसं कुणी नाही. एक गोष्ट मी जरूर सांगेन, मुद्दामहून आठवण करून देईन. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांसारखे पंतप्रधान झाले. इतरही पंतप्रधान झाले. त्यांनी कामे चांगली केली. पण तेव्हा काँग्रेस पक्षात त्या दर्जाचे नेते होते. आता तिथे तशा दर्जाची कुणीही नेतेमंडळी दिसतही नाहीत. राहुल गांधी नेमके काय करताहेत हाही प्रश्न लोकांसमोर आहे. कधी तरी ते बरं बोलतात आणि कधी वाटतं, अरे ही काय गडबड केली…

पण नेता हा निवडणुकीनंतरही निर्माण होतो अनेकदा… जसे तीन राज्यांतल्या निवडणुकांमध्ये… मग ते मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा छत्तीसगढ असेल, तिथेसुद्धा नेता नव्हता. पण लोकांनी भाजपचा पराभव केला. नेता नंतर निर्माण झाला… देशाच्या राजकारणात असं अनेकदा झालं आहे की, नेता नंतर निर्माण झाला.

पण तिकडे पक्ष होता…तीनही ठिकाणी पक्षाच्या पातळीवर स्थानिक नेतृत्व होतं, जसं राजस्थानात गेहलोत आणि पायलट… मध्य प्रदेशातही होते आणि छत्तीसगढमध्येही स्थानिक नेतृत्व होतं. लोकांना कोणाला माहीत नव्हतं, पण त्या बघेलबद्दल आपणच लिहिलं होतं की, बघेलने कसं राज्य पिंजून काढलं. तसा देश तेवढय़ा पातळीवर पिंजून काढल्यानंतर ज्याच्यावर विश्वास बसेल असा नेता कुणी आता दिसत नाही.

 काँग्रेसमुक्त हिंदुस्थान झाल्यामुळे या देशातील सगळे प्रश्न संपून जातील असं आपल्याला वाटतं का?

मी काँग्रेसमुक्त देश असं बोलतच नाही. मी काँग्रेस नष्ट करा असं कधी बोलत नाही. कारण विरोधी पक्ष राहिलाच पाहिजे… मला आजही आठवतंय, शिवसेनाप्रमुखांनी मागे मला सांगितलं होतं… उद्धव, एक लक्षात ठेव. मुख्यमंत्र्यावर तर जबाबदारी असतेच, पण विरोधी पक्षनेत्यावर त्याहून मोठी जबाबदारी असते! कारण विरोध करणं म्हणजे आकांडतांडव करणं नाही. त्याच्यावरसुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला जास्त पार पाडावी लागते. तसं जर का बघितलंत तर कुणालाही नष्ट करा असं मी कधी म्हणत नाही… नष्ट करा किंवा काँग्रेसमुक्त…हे मुक्त, ते मुक्त या अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत. फक्त आज काँग्रेसची अवस्था ही निर्नायकी आहे हे नक्की. त्यांच्याकडे तशा उंचीची नेते मंडळी नाहीत… जसे नरसिंह राव होते, नक्कीच होते. नरसिंह रावांनी नक्कीच चांगले काम केले.

VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे

 मनमोहन सिंग होते…

मनमोहन सिंगांनीसुद्धा पहिली पाच वर्षं चांगलंच काम केलं… पण त्या दर्जाची माणसं आता तशी कुणी दिसत नाहीत त्यांच्याकडे.

गेल्या चार वर्षांत अनेक मुद्दय़ांवर तुम्ही सरकारला धारेवर धरलंत. काँग्रेसच्या काळातसुद्धा आपण अनेक मुद्दय़ांवर निवडणुका लढवल्यात; पण या वेळेला कोणते मुद्दे तुम्हाला समोर दिसतात, की या मुद्दय़ांवर आपण निवडणूक लढवली पाहिजे. मला असं वाटतं की, आजही बेकारीचा प्रश्न तसाच आहे. किंबहुना गेल्या चार वर्षांत बेरोजगारी सर्वात जास्त वाढली. 45 टक्क्यांपेक्षाही जास्त… असे अनेक प्रश्न असताना हे मुद्दे तुम्ही लोकसभा निवडणुकीत घेणार आहात का?

– नक्की घेणार… बेरोजगारी हा सगळय़ात ज्वलंत प्रश्न आहे व तो सोडवावाच लागेल.

 सरकारमध्ये तुम्ही आहात… महाराष्ट्रात युती झालीय. त्यामुळे प्रश्न सुटतील का?

शिवसेनेची एक पद्धत आहे. जे आपण करू शकतो तेवढंच बोला. अवाजवी बोलू नका. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय की, लोकांशी खोटं बोलून मला एकही मत नकोय. समजा एकही मत पडलं नाही तर ते दुर्दैव आहे, पण मतं मिळवण्यासाठी खोटं बोलू नका. सगळय़ाच राजकीय पक्षांकडून माझी ही अपेक्षा आहे की, अवाजवी काही बोलू नये. अवाजवी आश्वासने देऊ नयेत, जेणेकरून लोकांच्या स्वप्नांना उगाचच कुठेतरी धुमारे फुटतील आणि ते पूर्ण करू शकलो नाही तर…

ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा ते सत्य बोलतात. ठाकरे कधी खोटं बोलत नाहीत. ठाकरे जुमलेबाजी करत नाहीत. पण राजकारणामध्ये जुमलेबाजीला महत्त्व आलंय किंवा जुमलेबाजीवर निवडणुका जिंकल्या जातात. जुमलेबाजीची गरज राजकारणात खरोखरच पडते का?

शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर, मी तुम्हाला काहीच देणार नाही असं म्हटलं तर लोक म्हणतील, ‘आम्ही तुम्हाला मतंही देणार नाही…’ म्हणून लोकांच्या आयुष्यात आता जे काही आहे त्यापेक्षा थोडे समाधानाचे… सुख हा आणखी मोठा शब्द आहे…

 …म्हणजे अच्छे दिन?

अच्छे दिन म्हणा किंवा सुखासमाधानाचे दिवस येतील हे त्यांना सांगावं लागतं… पण ते सुखासमाधानाचे दिवस आणताना अवाजवी घोषणा करणं हे कृपा करून होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे. कारण शेवटी लोकांच्या अपेक्षा खूप मोठय़ा असू शकतात. त्यांच्या अपेक्षांना आपण किती सत्य स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात आणू शकतो हे कळतं आणि तेवढय़ापुरतंच बोलावं जे आपण करू शकतो.

जर ही निवडणूक पूर्ण तुमच्या हातात असती लोकसभेची… तर तुम्ही जनतेला पहिलं आश्वासन किंवा वचन कोणतं दिलं असतं?

आता असं कोणतंही वचन किंवा आश्वासन शिल्लक राहिलेलं नाही, की जे कुणी दिलेलं नाही. म्हणून मी म्हटलं, प्रत्येक ठिकाणी अन्न, वस्त्र्ा, निवारा या तर मूलभूत गरजा आहेतच.

का पूर्ण होऊ शकत नाहीत या गरजा? आपण नेतृत्व करता, राजकारणात आहात आणि आपण अगदी गेल्या 70 वर्षांपासून मोदींच्या राजवटीपर्यंत अन्न, वस्त्र्ा, निवारा याच मुद्दय़ावर बोलतो आणि आश्वासने देतो…

अन्न, वस्र, निवारा… ही मला नाही वाटत की जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात पूर्ण झालेली संकल्पना असेल. कारण महागाई असते… सगळय़ाच गोष्टी असतात… त्यामुळे या गोष्टी सतत चालू असतात.

पण 15 लाख रुपये जेव्हा आपण प्रत्येक नागरिकाला द्यायची घोषणा करतो… जी पूर्ण होऊ शकत नाही…

मी कुठे केलीय?… आता राहुल गांधींनी केलीय…जनतेच्या खात्यात वर्षाला 72,000 रुपये टाकण्याची, पण देशाच्या तिजोरीचा कुणी विचार केलाय का?

पण तरीसुद्धा ‘15 लाख’ हा वादाचा विषय आजही आहे…

हेच माझं म्हणणं आहे की, अवाजवी घोषणा करू नयेत. लोकांना नेहमी खरं बोललेलं आवडतं. आणि ते फार मोठी अपेक्षा आपल्याकडून करीत नाहीत की, आम्हाला तुम्ही अमूक द्याल. त्यांचं रोजचं जे आयुष्य आहे तेवढय़ापुरतं खरोखर दिलंत तर ते म्हणतील, ठीक आहे, जेवढं जमतं तेवढं हा करतोय. पण एखादी अवाजवी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करू शकलो नाही तर लोकांचा असंतोष वाढत जातो.

 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा आपल्या मनातला अत्यंत महत्त्वाचा विषय…

होय, जिव्हाळय़ाचा विषय आहे शेतकरी…

आपण सातत्याने या विषयावर तेव्हाही बोलत होता… आताही बोलताय… हा सगळा जो विषय आहे तो फक्त राज्याचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा आहे. आपला देश कृषिप्रधान आहे. स्वतःला किसानपुत्र म्हणवून घेणारे लोक राजकारणात आहेत, नेतृत्व करीत आहेत. तरीही शेतकऱ्यांचा प्रश्न देशात का सुटू नये? खासकरून महाराष्ट्र… जे पुरोगामी राज्य आहे… शेतकऱ्यांचे राज्य आहे…

मागे एका कार्यक्रमात… ते नेते आजही आहेत. नावच घ्यायचं असेल तर ते मी घेऊही शकतो… त्यांच्यासमोर हा प्रश्न मी विचारला होता. तेव्हा ते कृषिमंत्री होते. त्यांनी त्या वेळी एक जगाची माहिती दिली होती. त्याच्यात त्यांनी इतर देश व त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत किती शेतकरी आहेत, त्यात कुठे 2 टक्के आहेत, कुठे 4 टक्के आहेत, कुठे 3.2 टक्के आहेत, तर कुठे 7 टक्के आहेत… आपल्याकडे मात्र 65 टक्के शेतकरी आहेत असं ते म्हणाले होते. म्हटलं, आपला देश तर कृषिप्रधान आहे… पण एकूणच काय होतंय, या शेतकऱ्यांसाठी खरंच आपल्याकडे चांगल्या योजना आहेत का?  तो मर मर मेहनत करतो. मला त्याचं कौतुक वाटतं- कोणीही ज्याला आपण गुंतवणूक म्हणतो. हा आपल्या आयुष्याची गुंतवणूक करतो. त्या गुंतवणुकीला काहीही आधार नसतो. पाऊस पडला तर पीक येणार. बरं, ते पीक सगळीकडे वारेमाप आलं तर त्याला भाव मिळणार नाही. कमी आलं, पाऊस नाही पडला तरी फुकट, जास्त आलं तरी फुकट. त्याचा तो विचार करीत नाही. त्याचं आयुष्य ठरलेलं आहे. या काळात हे पीक, त्या काळात हे पीक… आपण त्याला काय आधार देतो? ताबडतोबीचा आधार नक्कीच कर्जमुक्ती हा आहे, परंतु जर का दूरगामी आपण विचार केला तर त्याच्या मालाला हमीभाव हा एक विषय आणि योग्य भाव हा दुसरा…त्यासाठी मार्केटिंग आहे. इतर देश जर का परदेशातून अन्नधान्य मागवत असतील तर त्या देशांना आपल्याकडून काही पाठवू शकतो का?… असे अनेक विषय आहेत की, त्याच्यावर कृषी मंत्रालय हा जो काही प्रकार आहे… त्यांचं हे काम आहे. ते नेमकं करतं काय? आणि कृषी मंत्रालयात या गोष्टी बघणारे कुणी आहेत की नाहीत, हा पण एक मुद्दा आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा आपण गांभीर्याने विचार करतो तेव्हा सातत्याने शेतकरी अडचणीत आला की आपण कर्जमुक्तीची घोषणा करतो.

कारण त्याच वेळी तोच एक प्रथमोपचार असतो.

पण कर्जमुक्ती की शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव… यात तुम्ही काय निवड कराल?

एखादी गोष्ट लागल्यानंतर पहिला प्रथमोपचार असतो. तो प्रथमोपचार म्हणजे नक्कीच कर्जमुक्ती आहे. आणि त्याच्यानंतर त्यावर कायमचा इलाज करायचा असेल तर मग शेतीचं पॅटर्न ठरवावं लागेल. जसं गटशेती हा एक नवीन प्रकार येतोय. त्यानंतर कुठे काय पिकतं, कुठे काय. जे पीक आहे ते कुठे उत्तम दर्जाचं आहे. मग तिकडे नियंत्रित सर्व्हे करून ते पीक त्यांना घ्यायला लावायचं. आपल्याला कळलं पाहिजे की, या वर्षी आपल्या राज्यात एखादं पीक केवढं येणार आहे.

 तुम्ही शेतकऱ्यांसारखं बोलताय…

नाही… मी शेतकरी नाहीये… मी शेतकऱ्यांमध्ये फिरतोय… तो जो काही त्यांच्याकडून मला कळलेला त्यांचा अभ्यास आहे तो मी सांगतोय. त्यांचा तो माल कुठे जाऊ शकतो? किती वेळात तो पोहचला पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी जे मघाशी परदेशातलं म्हणत होतो ना… आता आपल्याकडे तिकडचं थोडंसं यायला लागलंय. कारण भाजीपाला हा नाशिवंत आहे. साधारणतः शेतातून आपल्याकडे येईपर्यंत असं मानलं जातं की, त्यातलं 30 टक्के जे पीक आहे ते तिकडेच संपून जातं…त्या वाहतुकीमध्ये. आणि परदेशात असं उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्यावर थंड वाफेचे फवारे वगैरे मारून ते जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. कोल्ड चेन… अशा काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध करून द्यायला पाहिजेत आणि त्या हळूहळू सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्रात तुम्ही हे कधी करणार? शिवसेनेची सत्ता आल्यावर करणार आहात? म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर…

नक्कीच… त्यासाठी अधिकार पण पाहिजेत आणि अधिकाराबरोबर जबाबदारीचे भान पाहिजे. नुसतं मला एखादं मुख्यमंत्रीपद…म्हणजे मला व्हायचं नाहीये… पण शिवसेनेचा मुख्यमंत्री… म्हणून मी धडपड करतोय… म्हणून ही तडफड आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाइतकाच तुमचा जिव्हाळ्याचा विषय होता राममंदिराचा… तुम्ही थेट अयोध्येवर स्वारी केली असं मी म्हणणार नाही… पण तुम्ही अयोध्येत पोहोचलात.

गेलो…आणि राममंदिराच्या उभारणीला गती मिळाली नाही तर मी पुन्हा अयोध्येत जाईन.

अयोध्येत तुमचं जाणं हा देशाच्या राजकारणातला, समाजकारणातला आणि धार्मिक क्षेत्रातला एक महत्त्वाचा बिंदू ठरला. संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. आणि राममंदिराला चालना मिळेल असं वातावरण तेव्हा आपण निर्माण केलं. पण आता परत एकदा युती झाल्यामुळे म्हणा किंवा आपण जी काही भाजपशी चर्चा केलीत त्यानुसार, त्यानंतर या विषयाला ब्रेक लागला आहे असं वाटत नाही का?

एक गोष्ट तर तुम्हाला मानावीच लागेल की, शिवसेना अयोध्येत गेल्यानंतर थंड बस्त्यात पडलेला राममंदिराचा मुद्दा हलायला लागला. त्याच्यावर पुन्हा देशभर एक वादळ निर्माण व्हायला लागलं… कोर्टालासुद्धा काही निर्णय, किंबहुना काही पावले उचलावी लागली. त्यानंतर एक मोठा निर्णय याबाबतीत झाला की, ती विवादास्पद जमीन सोडून बाकीची जमीन पुन्हा त्या ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

VIDEO: मावळ गोळीबार प्रकरणी सेनेची पोस्टरबाजी; अजित पवार म्हणाले...

65 एकर…

हो! 65 एकर… तो एक निर्णय झालेला आहे. जो अगदीच निपचित पडलेला विषय होता तो बराच पुढे गेलेला आहे. आता कोर्टानेसुद्धा मध्यस्थ नेमलेले आहेत. म्हणजे निदान एक हालचाल, सुरुवात झालेली आहे आणि मला असं वाटतं की, कोर्टाने मध्यस्थ नेमल्यानंतर त्यांनी आणखी एक गोष्ट कृपाकरून करायला पाहिजे की, या सगळ्याला कालमर्यादा घातली पाहिजे की, एवढय़ा मर्यादेत ते संपवा. नाही तर आम्हाला निर्णय द्यावा लागेल. तर आणि तरच हा विषय सुटेल आणि तिथे गेल्यानंतर एकूणच वातावरण मी बघितलंय सगळं. जनतेच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांबद्दल प्रचंड आस्था आहे, ती संपूर्ण देशात आहे. आणि मंदिर व्हावं ही संपूर्ण देशाची इच्छा आहे.

मराठय़ांविषयी कायम म्हटलं जातं की, ते युद्धात जिंकतात आणि तहात हरतात…

कोणत्या तहाविषयी आपण म्हणताय? मराठय़ांचे तहसुद्धा त्यांच्या इच्छेनुसारच झाले. छत्रपतींना आपण त्यासाठीच तर मानतो. पण छत्रपती हे महान योद्धे होते.

सगळे मुद्दे आम्हीच मांडले, हिरीरीनं मांडले. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी उचलायला हवे होते ते मी जनतेच्या हितासाठी उचलले. ते मानले गेले, स्वीकारले गेले आणि त्यावर उपाययोजनासुद्धा सुरू झाली असेल तर मग संघर्ष कशासाठी करायचा?

शिवसैनिकांवर माझा ठाम विश्वास आहे आणि सुदैवाने मी माझं भाग्य समजतो की, शिवसैनिकांचाही माझ्यावर अपार आणि गाढा विश्वास आहे. आणि हे माझं कर्तृत्व अजिबात नाही. केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून माझ्यावर त्यांचं प्रेम आहे. आणि त्यांना खात्री आहे की, मी जो निर्णय घेईन तो सर्वांच्या हिताचाच असेल आणि त्याच्यामुळे त्यांना लढ म्हटलं तर ते हिरीरीने लढतील आणि दोस्ती कर म्हटलं तर ते अत्यंत जिवाभावाची दोस्ती करतील. त्यांना माहितीये की, हा बाळासाहेबांचा मुलगा आपल्याला दगाफटका नाही करणार आणि मी एकच सांगतो… की मी कधी शिवसैनिकाला लाचार नाही होऊ देणार.

मी कधी कुणाच्या पाठीत वार केले नाहीत. ब्लॅकमेल या शब्दाशी माझा कधी संबंध आला नाही. युतीच्या घोषणेनंतर शिवसेना-भाजपचे मेळावे झाले. त्या मेळाव्यात मी मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे विचारलेय की, मुख्यमंत्री महोदय, आपणच सगळय़ांना सांगा की गेल्या पाच वर्षांत मी कधीतरी सरकारला दगा दिलाय का? किंवा पाठिंब्याच्या मोबदल्यात कोणत्याही वेडय़ावाकडय़ा कामासाठी तुमच्या मागे लागलो का? माझा वाद राज्याच्या हितासाठी व जनतेसाठी होता. म्हणून मी पुन्हा युती करू शकलो. जर मी वैयक्तिक स्वार्थासाठी युती केली असती तर शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसमोरसुद्धा उभा राहू शकलो नसतो.

मी सामान्य माणूस आहे आणि मी शिवसैनिक आहे. शिवसैनिक म्हटल्यानंतर वेगळं चौकीदार व्हायची गरज नाही. सैनिक हा सैनिक असतो. तो सर्वसामान्य माणसाचं रक्षण करतो… त्याच्या न्यायासाठी लढतो आणि म्हणून मला नव्याने चौकीदार होण्याची गरज नाही.

पण या वेळी शिवसेनेने तहातसुद्धा बाजी मारली…

‘तह’ शब्द तुम्ही वापरताय, मी नाही. जे झालंय ते प्रामाणिकपणाने झालंय. मी कधी कुणाच्या पाठीत वार केले नाहीत. ब्लॅकमेल या शब्दाशी माझा कधी संबंध आला नाही. युतीच्या घोषणेनंतर शिवसेना-भाजपचे मेळावे झाले. त्या मेळाव्यात मी मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे विचारलेय की, मुख्यमंत्री महोदय, आपणच सगळय़ांना सांगा की गेल्या पाच वर्षांत मी कधीतरी सरकारला दगा दिलाय का? किंवा पाठिंब्याच्या मोबदल्यात कोणत्याही वेडय़ावाकडय़ा कामासाठी तुमच्या मागे लागलो का? माझा वाद राज्याच्या हितासाठी व जनतेसाठी होता. म्हणून मी पुन्हा युती करू शकलो. जर मी वैयक्तिक स्वार्थासाठी युती केली असती तर शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसमोरसुद्धा उभा राहू शकलो नसतो.

पण आपण स्वबळाची भूमिका घेत असताना आपल्याच पक्षातील अनेक खासदार असतील किंवा मंत्री असतील हे युती व्हावी म्हणून दबाव आणत होते…

नाही…अजिबात नाही…

असे भाजपचे मंत्री सांगत होते…

नाही… अजिबात नाही… आणि या सगळ्या खासदारांना मला धन्यवाद द्यायला पाहिजेत. ते खासदार असले तरी ते सैनिकासारखे वागत होते.

हे नातं किती काळ टिकेल असं वाटतं?

कुठलं?

हे नवीन जे नातं निर्माण झालंय… भाजपबरोबर… ते किती काळ टिकेल?

नातं म्हणाल तर पंचवीस वर्षं टिकलंच ना? मग पुढची पाच वर्षं संघर्ष का झाला? ते विसरू नका. तर पुढची 25 वर्षं हे नातं टिकेल. आम्ही दोघांनी मिळून 25-30 वर्षे ज्यांच्याशी संघर्ष केला तेसुद्धा विसरू नका.

तुम्हाला काय म्हणायचे आहे?

आम्ही दोघांनी ‘युती’ म्हणून देशात संघर्ष केला आहे. काय वातावरण होतं तेव्हा देशात? हिंदू म्हणवून घेणं हा गुन्हा होता. हिंदुत्व ही शिवी होती. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असा उल्लेख सुरू झाला होता. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची जाग आणली. प्रमोद महाजन आता नाहीत, पण बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं, ‘प्रमोद, या देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन!’…आणि ते दिवस आले. मग आता समज-गैरसमज दूर केले नाहीत तर दोघांचे नुकसान ठरेल. दैव देते आणि कर्म नेते अशी आपली स्थिती होईल. आपण कर्मदरिद्री ठरू.

नातं टिकवण्याचा फॉर्म्युला काय?

प्रामाणिकपणा! आम्ही दगा देणार नाही. आम्हाला दगा देऊ नका.

महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री कोण होईल?

मला वाटतं, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट युतीच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला होतं त्याच्यात ते पुरेसं बोलकं आहे… की जबाबदारी आणि अधिकाराचं समसमान वाटप होईल.

म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल.

तुम्ही त्याचा अर्थ काय तो लावा मराठीत…

आपणही ते सांगितलेलं आहे…

मराठी भाषेत आणि लोकशाहीच्या व्याख्येत जबाबदारी आणि अधिकार याचं समसमान वाटपाचा अर्थ जो आहे तो आहे…

महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाविषयी आपलं काय म्हणणं आहे… जो गेले साडेतीन वर्षं अस्तित्वातच नव्हता…

आता तरी कुठेय? मला नाही वाटत यापूर्वी त्यांची अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असेल. मी नेहमी सांगतो की, विरोधी पक्ष पाहिजे… कारण सत्तासुद्धा डोक्यात जाता कामा नये. जे आम्ही म्हणतो की, आम्ही सत्तेवर किंवा सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवू… तसं अंकुश ठेवणारं कोणी तरी पाहिजे.

आपण ठेवलात ना इतकी वर्षं…

मग तेच मी म्हणतोय…ते काम खरं तर विरोधी पक्षाचं… पण मी केलं. जनतेच्या हितासाठी केलं. तसं विरोधी पक्षामध्ये गोंधळाचं वातावरण आहे. त्यांच्यात अजून कशावरही एकमत होत नाही. निवडणुका जाहीर झाल्या, उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली, तरीही कोणत्या जागांचं वाटप करायचं यावर खल सुरूच आहेत. पक्षांतरं सुरूच आहेत. त्यामुळे  रोज विरोधी पक्षांतले लोक एकमेकाला चेक करताहेत. अहो… आहात ना अजून… की गेलात… गेलात म्हणजे शिवसेना किंवा भाजपमध्ये… त्यांचा एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही… बरं कधी कधी पंचाईत अशी होते की, आपण जेव्हा ठरवतो की हा अमूक नेता आपल्यावर जास्त टीका करतोय, उद्या याला ठोकायचा… तो विचार पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या कुटुंबापैकी वडील किंवा पोरगा युतीतल्या कोणत्या तरी पक्षात आलेला असतो.

याला तुम्ही काय म्हणाल राजकारणात?

याला काय म्हणणार? काही वेळा प्रमाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना जर संधी मिळत नाही असे दिसते. त्या वेळी अन्याय झाला म्हणून पक्षांतर केले असं मानावं लागतं. पण स्वार्थासाठी जेव्हा असं पाऊल कुणी उचलतो तेव्हा त्याला आपण मतलबीपणा म्हणू शकतो.

पण ‘इनकमिंग’  सर्वाधिक भाजपात सुरू आहे. हा त्यांच्या हातात सत्ता असल्याचा परिणाम आहे? ज्याच्याकडे सत्ता असते तिथे इनकमिंग वाढतं की युती केल्यामुळे भ्रमनिरास झाला काही कुंपणावरच्या लोकांचा… आणि ते भाजपकडे जाताहेत.

असं आहे की, शिवसेनेकडे जे लोक येत आहेत ते व्हाया भाजप येत आहेत.

पण हे कितपत योग्य आहे?… जसं पालघर… आपण जर पालघरचं म्हटलंत.

म्हणून म्हटलं ना, की शिवसेनेत जे येताहेत ते तिकडे टेस्ट करून मगच आमच्याकडे येताहेत.

हा तुम्ही नवीन ‘पॅटर्न’ सुरू केलाय?

असं नाही… आधी पालघरबद्दल बोलतो… पालघरची पोटनिवडणूक गेल्या वेळी शिवसेना लढली ती परिस्थिती वेगळी होती. वनगा कुटुंबीय माझ्याकडे आले. श्रीनिवास पालघरला लढण्यास इच्छुक आहे असे त्यांनी सांगितले. मग आपण त्यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली आणि मी जाहीर केलं की, मी श्रीनिवासला दिल्लीत पाठवणार… खासदार बनवून… श्रीनिवास लढलाही. त्या निवडणुकीनंतर आता हा मधला आठ-दहा महिन्यांचा काळ गेल्यानंतर गेल्या आठवडय़ात श्रीनिवास मला येऊन भेटला आणि मला म्हणाला की, मला बाबांसारखं काम करायचंय… चिंतामणरावांसारखं. अजूनही मला असं वाटतं मला इकडे थोडं काम करणं गरजेचं आहे. मला आधी विधिमंडळात जाऊ द्या… तिथे काम करूद्या. मग पाच वर्षांनंतर माझी तयारी झाल्यावर तुम्ही लोकसभेबाबत निर्णय घ्या… म्हटलं बाबा, बघ. तुला मी लोकसभेचं वचन दिलेलं आहे. त्यासाठी मी हा मतदारसंघ मागून घेतलेला आहे. पण त्याची लोकसभा लढण्याची तूर्त तयारी नव्हती. मग मी त्याच्या कुटुंबीयांशीसुद्धा बोललो. त्याच्या मातोश्रींना पण मी बोलवून घेतलं होतं. त्यांचंही तेच मत होतं. हा त्या कुटुंबाचा प्रामाणिकपणा आहे. नाहीतर मी वचन दिलेलंच होतं. आता युतीत तो निवडूनही आला असता, पण त्याने स्वतःहून जेव्हा मला सांगितलं की, मला इकडे थोडीशी काम करण्याची गरज वाटतेय. मला पहिले इथे शिकू द्या… मग ऐन वेळेला प्रश्न असा येतो की, मग नवीन चेहरा कुठून आणायचा? मग इकडे-तिकडे शोधण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे, आपल्या युतीमध्ये एक चेहरा आहेच. राजेंद्र गावीत. मुळात खासदार झालेले आहेत… खासदारकीचा त्यांना गेले आठ महिन्यांचा अनुभव आहे. त्यांनाच आपण खासदार म्हणून पाठवू.

साताऱ्यातही…

हो साताऱ्यातही तेच झालं. साताऱ्यामध्ये गेल्या वेळेला ही जागा मित्रपक्षाला दिली होती. आणि तिथे आता नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाबद्दल ज्या वेळी चर्चा झाली तेव्हा मला पण एक मुद्दा पटला. माथाडी कामगार हा केवळ ओझी वाहणारा एवढाच विचार आपण करायचा का? का त्याला संधी द्यायची नाही? का त्याला संसदेत पाठवायचं नाही? अण्णासाहेब पाटील हे माथाडी कामगारांचे नेते, त्यांचे आणि शिवसेनाप्रमुखांचे ऋणानुबंध होतेच. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल खूप आदरभाव होता. शिवसेनाप्रमुख आणि अण्णासाहेब तेव्हा एकत्र आले असते तर आज राज्य एका वेगळ्या दिशेने गेलं असतं. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. पण आता मला वाटलं की, नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देऊन आपण त्या वेळी अपूर्ण राहिलेले ते काम या पिढीत पूर्ण करावे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली त्यावर तेसुद्धा म्हणाले, ‘उद्धवजी, बरोबर आहे तुमचं, नरेंद्र चांगला उमेदवार आहे. लढत देईल, जिंकून पण येईल आणि एका कष्टकरी वर्गाला आपण चांगलं प्रतिनिधित्व देऊ.’

मुख्यमंत्र्यांविषयी आपलं काय मत आहे? सध्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल…

सध्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल मी सध्याचं मत नाही सांगत. माझं पहिल्यापासून मत असं आहे की, माझे ते अतिशय चांगले मित्र आहेत. आणि हे मी आता युती झालीय म्हणून बोलत नाही. मी जाहीर सभेतसुद्धा हे बोललेलो आहे. माझे आणि त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत, मैत्री चांगली आहे. हां… ज्या वेळेला युती नव्हती त्या वेळेला सहाजिकच आहे, माझ्याकडून शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मी आणि त्यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून ते… एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचो, पण ती त्या त्या भूमिकेची गरज होती.

आता कटुता संपली आहे का?

कटुता आमच्या दोघांमध्ये व्यक्तिगत नव्हतीच. हे मी आजही सांगतो, तेव्हाही सांगितलेलं आहे आणि जाहीर सभेतही बोललेलो आहे.

पण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कटुता होती…

नाही. मला तसे वाटत नाही. शिवसैनिकांवर माझा ठाम विश्वास आहे आणि सुदैवाने मी माझं भाग्य समजतो, की शिवसैनिकांचाही माझ्यावर अपार आणि गाढा विश्वास आहे. आणि हे माझं कर्तृत्व अजिबात नाही. केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून माझ्यावर त्यांचं प्रेम आहे. आणि त्यांना खात्री आहे की, उद्धव जो निर्णय घेईल तो आपल्या हिताचा असेल आणि त्याच्यामुळे त्यांना लढ म्हटलं तर ते हिरीरीने लढतील आणि दोस्ती कर म्हटलं तर ते अत्यंत जिवाभावाची दोस्ती करतील. कारण त्यांना माहितीये की, हा बाळासाहेबांचा मुलगा आपल्याला दगाफटका नाही करणार आणि मी एकच सांगतो… की मी कधी शिवसैनिकाला लाचार नाही होऊ देणार.

अमित शहांविषयी आता आपली काय भूमिका आहे?

अमित शहा दोनदा घरी आले… शिवाय त्यांचा आणि माझा संवाद होतच असतो. अधेमध्ये फोनवरसुद्धा माझं आणि त्यांचं बोलणं होत असतं. आणि त्यांनीही मला सांगितलं की, उद्धवजी बीच मे जो भी कुछ हुआ था, उसे हमे सुधारना है… आगे इसको बढाना नही है… आपल्याला ते संपवायचंय. मीही म्हटलं ठीक आहे…

पंतप्रधानांशी काय संपर्क या मधल्या काळात?

आता एवढय़ा काळात झालेला नाही… पण आता होईल.

पंतप्रधानांनी देशातल्या सगळ्यांना ‘चौकीदार’ करून टाकले आहे. आपणसुद्धा चौकीदार झाला आहात का?

मी कॉमन मॅन आहे… सामान्य माणूस!

मग त्यांनी सामान्य माणसालाच चौकीदार केलंय.

असेल. कल्पना चांगली आहे. प्रत्येकजण आपापल्या नजरेने कसं बघतो त्याच्यावर आहे. मी सामान्य माणूस आहे आणि मी शिवसैनिक आहे. शिवसैनिक म्हटल्यानंतर वेगळं चौकीदार व्हायची गरज नाही. सैनिक हा सैनिक असतो. तो सर्वसामान्य माणसाचं रक्षण करतो… त्याच्या न्यायासाठी लढतो आणि म्हणून मला नव्याने चौकीदार होण्याची गरज नाही.

म्हणजे समाजाच्या रक्षणार्थ बाळासाहेबांनी जो निर्माण केला.

होय तोच मी सैनिक आहे… शिवसैनिक आहे…

निवडणुकांनंतर पंतप्रधान कोण होतील?

हा काय प्रश्न झाला? नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आहेत आणि विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदासाठी एकही चेहरा नाही. पंतप्रधानपदी आता तरी मोदींऐवजी दुसरं कोणी बसवावं अशी वेळ आली आहे, असं मला तरी वाटत नाही.

चार वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेकडे 18 खासदार होते तेव्हा शिवसेनेच्या वाटय़ाला केंद्रामध्ये महत्त्वाचा रोल किंवा खाती आली नाहीत. जेमतेम एखादं अवजड उद्योग खातं आलं. 2019 ला ही स्थिती सुधारेल असं वाटतं का?

शेवटी आता हे नातं सुधारण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांवर आहे. मी काही मागायला कुठेही जाणार नाही. आणि मुळात आता आधी युतीला जास्तीत जास्त यश मिळवून देणं हे दोन्ही पक्षांचं काम आहे. त्याच्यामुळे पुढचे डोहाळे आता लागण्याची गरज नाही. निवडणूक हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कोणी किती कमजोर आहे असं म्हटलं तरी विरोधकांना कमजोर लेखून चालणार नाही, आपण गाफील राहता कामा नये, गलथानपणा होता कामा नये. मी तर म्हणेन राज्यातल्या 48 च्या 48 जागा युतीने जिंकल्याच पाहिजे. या निश्चयाने दोन्ही पक्षांनी उतरलं पाहिजे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नक्कीच एक वातावरण निर्माण केलंय. त्याला यश किती मिळेल हा पुढला प्रश्न. तुम्हाला राहुल आणि प्रियंकाविषयी काय वाटतं नक्की?

मला व्यक्तिगत कोणाहीबद्दल द्वेष नाहीये. ते दोघेही माझ्याहून वयाने लहान असल्यामुळे मी त्यांना मुलं म्हणतो… या दोन्ही मुलांची सध्या राजकारणात स्थिरावण्याची धडपड सुरू आहे. त्यांचं यश-अपयश पुढे कळेलच. परंतु मघाशी म्हटलं तसं, राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतील का?…या प्रश्नाला अजून तरी होकारार्थी उत्तर मिळत नाही. अजूनही असा काही निश्चित आकार-उकार त्यांच्या नेतृत्वाला येतोय असं वाटत नाही.

भारतीय जनता पक्षातून अधिकृतरीत्या आडवाणी युगाचा अस्त झाला. तुम्ही त्यांच्याबरोबरही काम केलंय. ते एनडीएचे प्रमुख होते आणि आता त्यांना पक्षातून किंवा निवडणुकीच्या राजकारणातून दूर करण्यात आलेलं आहे. या प्रक्रियेविषयी आपल्याला शिवसेनाप्रमुख म्हणून काय वाटतंय?

मी स्वतःला शिवसेना पक्षप्रमुख म्हणतो… कारण शिवसेनाप्रमुख फक्त एकच. आणि तुम्ही तो शिवसेनाप्रमुख असा शब्द उच्चारलात म्हणून मी शिवसेनाप्रमुखांची एक आठवण सांगतो…

मी म्हणूनच तो उच्चारला…

स्वतः शिवसेनाप्रमुखांनी… तुम्ही बघितले असेल, त्याला स्वतः साक्ष आहात, शिवसेनेचे सर्व नेते आणि शिवसैनिक साक्ष आहेत की शिवसेनाप्रमुखांच्या अखेरच्या पाच-दहा वर्षांत शिवसेनेत नवीन पिढी कार्यरत होती… त्यात मीही आलो आणि त्यात तुमच्यासारखे काही नेतेही आले… शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर शिवसेनेचा कारभार सोपवला होता आणि शिवसेनाप्रमुख स्वतः लक्ष ठेवून होते, ते मार्गदर्शन करायचे. जेव्हा आवश्यक असेल तिथे त्या वेळी ते बोलायचे. तशी ते दिशा द्यायचे. दसरा मेळाव्यातून ते मार्गदर्शन करायचे… कधी ‘सामना’तून दिशादर्शन व्हायचं. जुन्या पिढीने एका विशिष्ट टप्प्यावर नव्या पिढीवर जबाबदारी सोपवणं हा एक निसर्गाचा नियम आहे. याचा अर्थ असा नाही की, त्यांना रिटायर्ड केल्यानंतर त्यांना विसरून जायचं. नाही… सदैव त्यांचे आपण ऋणी राहिलं पाहिजे. कारण शिवसेनाप्रमुख, अटलजी, अडवाणीजी या तिघांनीही जी मेहनत केली आहे आणि विचारांची जी बीजं पेरली, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत बीजं पेरली. तो काळ संघर्षाचा होता. या देशात हिंदू म्हणणं हा गुन्हा होता, असे दिवस होते… त्या काळात या नेत्यांनी रथयात्रा काढली, हिंदुत्वाचा उच्चारच नव्हे तर प्रसार केला गेला. या नेत्यांनी जिवावरचे धोके पत्करले म्हणून आपल्याला हे दिवस दिसताहेत. अन्यथा आपण कुठे असतो ते आपल्यालाही कळलं नसतं. म्हणून त्यांचे ऋण आपण नेहमी मानले पाहिजेत.

 मोदी है तो मुमकीन, बाळासाहेब है तब भी सबकुछ मुमकीन था. उद्धव ठाकरे है तो क्या क्या मुमकीन हो सकता है?

उद्धव ठाकरे है तो मुमकीन भी है और थोडासा नमकीन भी है…!

 मुमकीन क्या और नमकीन क्या?

मुमकीन असं आहे… या शाब्दिक कोटय़ांचं जाऊद्या…

पण त्या शाब्दिक कोटय़ांनाही अर्थ आहे. उद्धव ठाकरे नेहमी नमकीनच राहिले,  झणझणीत राहिले. ठाकरे म्हणजे ठेचा आहे तो…

नमकीन याचे कारण… मी कधी कोणाला बरं वाटावं म्हणून खोटं नाही बोलणार. मग माझा मित्र चुकत असेल तर चूक मी लक्षात आणून देईन. पण म्हणून मी त्याचा विरोधक आहे असे कुणी मानले तर ते दुर्दैव आहे. पण मुमकीन एवढय़ासाठी म्हणतो, की आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे ठरवणारा माणूस किंवा व्यक्ती पंतप्रधानपदी बसला तर मग प्रत्येक गोष्ट ही मुमकीन आहे. केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत आणि दिवस ढकलायचे तर मग कुणीही त्या खुर्चीवर बसलं तरी काहीही होणार नाही. आणि मला असं वाटतं, मोदींनी काही चांगल्या गोष्टी नक्कीच केलेल्या आहेत. निदान निर्णय घेणारे सरकार आहे ही प्रतिमा तरी निर्माण झालीय…

उद्धवजी, आपण अनेक प्रश्नांना फार छान, परखडपणे ठाकरी शैलीत मघापासून उत्तरं देताय. हे सगळे लोकांच्या मनातले प्रश्न आहेत. माझा प्रश्न इतकाच आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला लोकांनी का मतदान करावं? याचे फक्त तुम्ही दोन मुद्दे सांगा.

दोन मुद्दे… दोन्ही पक्षांना मैत्रीचं महत्त्व आणि राजकीय दुराव्याचे तोटे हे दोन्ही कळलेले आहेत. एकत्र राहिलो तर काय होऊ शकतं, वेगळं राहिलो तर काय घडू शकते हा अनुभव घेतलेले हे दोन पक्ष आहेत.

म्हणजे आता कुठेही मैत्रीमध्ये आणि मनामध्ये तडे राहिलेले नाहीत.

नक्कीच… आणि म्हणून मी म्हटलं नं… आम्ही कोणाला दगा देणार नाही. कुणी आम्हाला दगा देऊ नये ही आमची साधी भूमिका आहे. जे काही करायचं ते प्रामाणिकपणाने. मी जी भूमिका घेतली होती, जे मुद्दे घेतले होते, उचलले होते ते जनतेचे होते. त्याला उत्तरं मिळाल्यानंतर मला असं वाटतं, उगाच आकांडतांडव करत बसण्यात अर्थ नाही.

युतीची कॅचलाइन अशी आहे की, आम्ही दगा देणार नाही, तुम्ही दगा देऊ नका!

आणि आपण दोघे मिळून जनतेला दगा नको देऊया…

फार चांगली कॅचलाइन आहे. आणि मला असं वाटतं की हीच ओळ किंवा लाइन… संपूर्ण महाराष्ट्रात आपण नवीन वातावरण निर्माण केल्यासारखं दिसतंय…

राज्यात नाही तर संपूर्ण देशात. कारण युती झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी चांगल्या घडायला लागलेल्या आहेत.

शिवसेना सोबत आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक नैतिक बळ नक्कीच मिळालंय…

नक्कीच मिळालंय.

उद्धवजी… धन्यवाद! आपण ही मुलाखत दिलीत आणि जवळजवळ सगळ्याच प्रश्नांना आपल्या ठाकरे शैलीत उत्तरं दिलीत आणि मला असं वाटतं, या मुलाखतीनंतर आणि आपल्याशी झालेल्या चर्चेनंतर…

युती कायम राहील.

युती तर कायम राहील आणि लोकांच्या मनातले संभ्रम दूर होतील. पुन्हा एकदा धन्यवाद… जय महाराष्ट्र…!!

जय हिंद… जय महाराष्ट्र…!!

 

Tags:
First Published: Apr 2, 2019 09:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading