ठाकरे सरकार टिकवण्यात शरद पवार नाही तर 'ही' व्यक्ती महत्त्वाची!

ठाकरे सरकार टिकवण्यात शरद पवार नाही तर 'ही' व्यक्ती महत्त्वाची!

नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकार नागपुरात, पाच वर्षे टिकेल; काळजी नसावी असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' मधून भूमिका मांडली.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर घडलेल्या एकूण घडामोडी आणि त्यानंतर स्थापन झालेल्या महाआघाडीचे सरकार सत्तेत आले. बहुमत चाचणी जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली. त्यानंतर होणाऱ्या नागपूर अधिवेशनात यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेले हे सरकार टिकणार नाही असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकार नागपुरात, पाच वर्षे टिकेल; काळजी नसावी असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेण्याआधी राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी गुपचूप शपथविधी उरकल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर 80 तासांच्या आत अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस सरकार बहुमत चाचणीच्या आधीच कोसळले. यावरून टीका करताना संजय राऊत यांनी म्हटलं की, यांनी 80 तासांचे सरकार बनवले त्यांना आजही वाटते, उद्धव ठाकरे यांचे सरकार 80 दिवस टिकणार नाही. या भ्रमातून आता सगळ्यांनी बाहेर यावे. सरकार नागपुरात पोहोचले आहे. मुंबईत येऊन संपूर्ण मंत्रिमंडळ बनेल व नंतर पाच वर्षे टिकेल.

उद्धव ठाकरेंचे सरकार टिकण्यात कोणाची भूमिका महत्त्वाची हे सांगताना संजय राऊत यांनी अजित पवार यांचे नाव घेतले आहे. सगळय़ात मोठे प्रश्नचिन्ह आहे ते अजित पवारांच्या भूमिकेविषयी. 80 तासांचे सरकार ज्यांनी फडणवीस यांच्याबरोबर स्थापन केले ते अजित पवार काय करतील? भाजपच्या सर्व आशा आजही फक्त अजित पवारांवरच टिकून असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवारांचे काय? यावर शरद पवार यांना विचारले असता पवार विश्वासाने म्हणाले, ‘‘अजित पवारांची चिंता करू नका. हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील. निश्चिंत राहा!’’ शरद पवार निश्चिंत आहेत तोपर्यंत सरकार स्थिर आहे. महाराष्ट्र निश्चिंत आहे. हे सरकार टिकवायचेच या एका निर्धाराने शरद पवार उभे आहेत. काळजी नसावी असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 08:10 AM IST

ताज्या बातम्या