नवी दिल्ली, 7 डिसेंबर : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. राहुल गांधी आणि राऊत यांच्या भेटीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. कारण राज्यातील आगामी महापालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर विधानसभा आणि पुढे लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट मानली जात होती. शिवसेना युपीएत (UPA) सामील होणार का? भाजपविरोधात (BJP) देशभरात जी आघाडी निर्माण होईल त्या आघाडीत शिवसेना असणार का? त्या आघाडीत तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC) असणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर या सर्व प्रश्नांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली? याबाबत माहिती दिली.
"काही चर्चा या चार भिंतीत होतात. त्या फक्त वरिष्ठांशीच चर्चा करायच्या असतात. त्यामुळे मी आज रात्री पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलेन. त्यांनी परवानगी दिली तर तुमच्याशी बोलेन. राहुल गांधी यांच्यासोबत प्रदीर्घ काळ चर्चा झाली. राजकीय विषयांवरच या बैठकीत चर्चा झाली. काही काळ त्या बैठकीत काँग्रेस नेते वेणुगोपाल सुद्धा सामील झाले होते. विरोधकांचं ऐक्य, महाराष्ट्र सरकार, काही संघटनात्मक विषय, देशातील एकंदरीत परिस्थिती अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधनीबाबत त्यांच्या मनात नेहमीच उत्सूकताच असते. त्याबद्दल ते विचारत असतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काल संसदेत भेटल्या होत्या. त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आस्थेने चौकशी केली होती. या महिन्याच्या शेवटच्या काही काळात राहुल गांधी यांच्या मुंबईचा दौरा ठरतोय. तेव्हा त्यांची मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा आहे", असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा : आशिष शेलारांच्या वक्तव्यावर सेना आक्रमक होताच, भाजपची सपशेल माघार!
"देशामध्ये विरोधी पक्षाचं एक मजबूत संघटन उभं राहावं आणि ते एकच संघटन असावं, असं आमचं मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचं हेच मत आहे. वेगवेगळ्या आघाड्या स्थापन करण्यापेक्षा एकच आघाडी असावी, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आम्ही महाराष्ट्रात जरी काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर सरकार चालवतो. तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही एक प्रकारची यूपीएच आहे. या देशात एनडीए आणि यूपीए दोन वेगवेगळ्या प्रकारचे कामे करत होते. यापैकी एनडीएत आम्ही थेटपणे काम केलं. एनडीएमध्ये सुद्धा भिन्न विचाराचे नेते आणि पक्ष सामील झाले होते. एनडीएमध्ये हिंदुत्वाला विरोध करणारेही पक्ष अटलींच्या नेतृत्वात काम करत होते. एनडीएमध्ये राम मंदिराच्या लढ्यास विरोध करणारे नेते आणि पक्ष होते. त्यामुळे अटलजींच्या नेतृत्वाखालील एनडीएला समान नागरी कायदा आणि राम मंदिराचा विषय हा काही काळ बाजूला ठेवावा लागला होता. सरकार चालावं यासाठी किमान समान कार्यक्रमामध्ये काही विषय ठेवावे लागतात", असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : बॅन लिपस्टिक व्हिडिओ मागील सत्य अखेर आलं समोर, अनुराधाशी कनेक्शन
"भाजपविरोधात तयार करण्यात येणाऱ्या आघाडीचं कोण नेतृत्व करावं या विषयावर मी प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. यासाठी अनेक ज्येष्ठ लोकं काम करत आहेत. शरद पवार अनेक वर्षांपासून काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आपली भूमिका सांगितलेली आहे. याशिवाय नेता नंतरचा विषय आहे सध्या आघाडी तयार होणं जरुरीचं आहे, असं शरद पवारांचं मत आहे. राहुल गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकारण, उत्तर प्रदेश आणि गोव्याची निवडणूक या विषयावर चर्चा झाली. युपीए विषयी पुढच्या 24 तासात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सांगेन", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.