'हाऊडी मोदी' च्या धर्तीवर संजय राऊतांचा 'केम छो' प्लॅन, भाजपला देणार धक्का

'हाऊडी मोदी' च्या धर्तीवर संजय राऊतांचा 'केम छो' प्लॅन, भाजपला देणार धक्का

राज्यातील अनेक शहरात खास गुजराती समाजाबरोबर शिवसेना संवाद साधणार आहे. याची सुरुवात नाशिकपासून होणार असल्याचं कळतंय.

  • Share this:

नाशिक, 24 जानेवारी : मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेऊन शिवसेना नावारुपास आली. आता पुन्हा एकदा शिवसेना गुजराती समाजाशी जवळीक करण्याच्या तयारीत आहे.  राज्यातील अनेक शहरात खास गुजराती समाजाबरोबर शिवसेना  संवाद साधणार आहे. याची सुरुवात नाशिकपासून होणार असल्याचं कळतंय.

नाशिकमध्ये ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिरात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची उद्या प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतकार राजू परूळेकर हे त्यांची मुलाखत घेतील. या प्रकट मुलाखतीसाठी गुजराती समाजातील प्रतिष्ठित, समाजाचे नेते आणि व्यावसायिक यांना खास आमंत्रण देण्यात आल्याचं कळतंय. या कार्यक्रमात संजय राऊत शिवसेनेची भूमिका मांडणार आहे.  या कार्यक्रमानंतर  राज्यातील अनेक शहरात खास गुजराती समाजाबरोबर शिवसेना  संवाद साधणार आहे. गुजराती समाजासोबत संवाद साधण्याच्या या मोहिमेची नाशकातून एका प्रकारे सुरूवात होत आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनीही गुजराती समाजाला हाक दिली होती.

मतदारसंघांतील बहुभाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्यांनी त्यांच्या मातृभाषेचा वापर केला खरा; परंतु, मराठी अस्मितेसाठी आग्रही असणाऱ्या ठाकरे कुटुंबाने केम छो म्हणत साद घातली होती.

तेव्हा आदित्य ठाकरेंनी वरळीच्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'केम छो वरली!'चे फलक नाक्यानाक्यावर लावले होते. त्यामुळे सोशल मीडियावर एकच कल्लोळ उडाला होता. त्यामुळे कधी काळी मराठीचा जागर करणाऱ्या शिवसेनेला गुजरातीचा पुळका आला की काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या पोस्ट व्हॉट्सअॅप, फेसबुकवर व्हायरल झाल्या होत्या. विरोधकांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली होती. परंतु, विरोधकांनी केलेल्या टीकेला मतदारांनीही खतपाणी घातलं नाही.

वरळी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे भरघोस मतांनी विजयीही झाले. एवढंच नाहीतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सेनेनं भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेसला सोबत घेत महाविकासआघाडी सरकार स्थापन केलं.

विशेष म्हणजे, एकीकडे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजप सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे गुजराती समाजाशी संवाद साधून भाजपची व्होट बँक फोडण्यासाठी सेनेनं कंबर कसली आहे.

First published: January 24, 2020, 5:33 PM IST

ताज्या बातम्या