बुलडाणा : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. यावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातले देव संपले का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले. आणि आमचे मुख्यमंत्री 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले ,असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. ते आज बुलडाण्यात आयोजित सभेत बोलत होते.
राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. इथे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले. आणि आमचे मुख्यमंत्री 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. या रेड्यांचा राजकीय बळी घेतला पाहिजे, यांनी महाराष्ट्राची बदनामी केली असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
'रेड्याचा राजकीय बळी'
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की', हे बेकायदेशीर सरकार लवकरच जाणार आहे. एकही खोकेवाला पुन्हा निवडून येता कामा नये. या रेड्यांचा राजकीय बळी घेतलाच पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. शिवसेना आधीपेक्षा जोमाने पुढे जात आहे. गद्दारीचं बीज उखडून फेकण्यासाठी हाती मशाल घेतली आहे. वेळ पडली तर शिवसेनेसाठी जन्मठेप सुद्धा स्विकारायला तयार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंचा निशाणा
दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर घणाघात केला आहे. मुख्यमंत्री हात दाखवण्यासाठी ज्योतिषाकडे जातात. जे दुसऱ्याला आपला हात दाखवतात ते जनतेचं काय भविष्य बघणार. तुमचं भविष्य घडवणारे दिल्लीत बसले आहेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut, Uddhav Thackeray