मुंबई, 26 मे : महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे वारंवार आठरा जागांवर दावा करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आठरा जागांवर दावा केला आहे. दादरा नगर हवेली धरून आमचे 19 खासदार लोकसभेत जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपला टोला
दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवीन संसद भवनाचं उद्घाटन हा विषय सर्वोच्च न्यायालयाचा नाही तर हा विषय नैतिकतेचा आहे. भाजपनं आमची भूमिका समजून घ्यायला पाहिजे. हा सविधानाच्या आणि राष्ट्राच्या सन्मानाचा प्रश्न आहे. निमंत्रण पत्रिकेत उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांचं नावच नाही. त्यांना निमंत्रण द्यायला हवं होतं. पण यावर कोणीच बोलत नाही, हा एका पक्षाचा कार्यक्रम नसून, देशाचा कार्यक्रम असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटावर निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शिंदे गट म्हणजे भाजपानं पाळलेलं कोंबडीचं खुराडं आहे. लोकसभेच्या पाच पक्षा अधिक जागा त्यांच्या वाट्याला येणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, NCP, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray