सागर कुलकर्णी, 14 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून आता उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. संजय दौंड हे राष्ट्रवादीकडून या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारी मिळालेले संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. संजय दौंड अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं आहे. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत. पण शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता विधान परिषदेसाठी दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक सक्षम व्हावी यासाठी शरद पवार आग्रही आहेत. संजय दौंड यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यामागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे. दौंड हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य असल्याने स्थानिक पातळीला त्यांचा चांगला संपर्क आहे. याचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे.
'रात्रीनंतर दिवस येत असतो, राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार'
दरम्यान, साधारण दुपारी 1 वाजता विधानभवन येथे संजय दौंड अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील हे उपस्थित राहतील.
भाजपकडून राजन तेली यांना उमेदवारी
भाजपनं या निवडणुकीसाठी राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता विधानभवनात अर्ज भरणार आहेत. मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आपली चुलत बहीण आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.