सांगली, 23 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगलीतल्या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विभागाकडून या ठिकाणी नव्या रचनेच्या माध्यमातून सदर जागेची मोजणी करण्यात आली. यानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सदर जागेवर बांधण्यात येणारे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा स्पष्ट केलं आहे. सदरच्या जागेवर सांगली महापालिका शाळेचं आरक्षण आहे. सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर हे आरक्षण आहे. त्यामुळे या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगलीच्या जुना कुपवाड रोडवरील मंगलमुर्ती कॉलनी या ठिकाणी बेकायदेशीररित्या मशिद बांधण्यात येत असल्याचा मुद्दा आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आज सकाळपासून घटनास्थळी तणावपूर्ण शांतता होती. हिंदू समाजातील नेत्यांबरोबर मुस्लिम समाजातील नेते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. महापालिकेनेही तातडीने या घटनेची गंभीर दखल घेऊन घटनास्थळी पोहचत सदर जागेची मोजणी केली. नगररचना विभागाकडून ही मोजणी करण्यात आली. त्याचबरोबर या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाकडून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाचा - राज ठाकरेंच्या सभेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंना टाळी? राज्याच्या राजकारणातली मोठी अपडेट
या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाबाबत नेमकी काय कारवाई होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. सदरच्या जागेवर महापालिकेच्या प्राथमिक शाळेचं आरक्षण आहे. सुमारे सव्वा एकर जागेवर हे आरक्षण असून या ठिकाणी ज्या जागेवर बांधकाम करण्यात आलेलं आहे. त्या जागेवर असणारे बांधकाम अनाधिकृत आहे. त्यामुळे ते तात्काळ पाडण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सदरच्या ठिकाणी मशिदीसाठी उभ्या करण्यात आलेलं पत्र्याचे शेड किंवा इतर बांधकाम हे कोणत्याही क्षणी पाडले जाणार आहे.
महापालिका आयुक्त पवार यांच्या निर्णयानंतर आता घटनास्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आता महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील या अतिक्रमण विरोधी पथकासह दाखल झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj Thackeray, Sangli news