सांगली, 30 जानेवारी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 10 वर्षांपूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात सुपुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अव्याहत पणे सुरू आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची क्रूर घटना 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात भरदिवसा घडली. या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्यापही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुरोगामी विचारकांची हत्या झाली त्यात सर्वप्रथम डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांनी चळवळींमध्ये जी सामूहिक नेतृत्वाची संकल्पना रुजविली, त्यामुळेच पुढच्या फळीचे कार्यकर्ते तयार झाले व त्यांच्याच बळावर महाराष्ट्र अंनिससह इतर संस्था भविष्यातील वाटचाल करणार आहे.
150 शाखांमार्फत काम
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यभरातून हजारो कार्यकर्ते संघटनेशी जोडले गेले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये महाराष्ट्रातील 300 शाखांतील 4 हजार कार्यकर्ते जोडले होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या विचाराने कार्यकर्त्यांनी स्वतःला सावरून 150 हून अधिक शाखा वाढविल्या. या शाखेच्या माध्यमातून दाभोलकर यांच्या विचारांचे कार्य जोमाने सुरू असल्याचे कार्यकर्ते सांगतात.
धीरेंद्र शास्त्रींचे सत्य काय? देवघरचे पुरोहित म्हणतात, सर्वात मोठा चमत्कारी इथे
5 हजार कार्यकर्ते
तरुणांमध्ये विचार रुजविण्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन प्रबोधन करण्यात येते. सध्या 5 हजार कार्यकर्ते काम करत आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक जाणीव हा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी व्हॅन तयार केली आहे. त्या व्हॅनमार्फत प्रबोधन केले जाते.
शॅडो सायन्सच्या विरोधात काम
कॉलेजमध्ये विवेक वाहिनीतर्फे जागृती केली जाते. भोंदू गिरीचा पर्दाफाश करण्याचे काम सुरूच आहे. सध्या अत्याधुनिक युगात बुवाबाबा विज्ञानाचे नाव घेऊन फसवत आहेत. अशा शॅडो सायन्सच्या विरोधात सध्या काम सुरु आहे. यांसह अनेक उपक्रम अनिसमार्फत सुरु असल्याची माहिती सांगलीतील अंनिसचे कार्यकर्ते यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.