आसिफ मुरसल, प्रतिनिधी
सांगली, 29 मार्च : जिल्ह्यातील तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ माजली होती. मात्र, सांगलीच्या कर्तबगार पोलिसांनी या लुटीचा छडा लावला. अवघ्या आठ तासांमध्ये पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
अज्ञात हल्लेखोरांनी लुटलं
तासगावच्या दत्तमाळ येथील वसंतदादा महाविद्यालयात शेजारी असणाऱ्या गणेश कॉलनी येथे मंगळवारी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी व त्यांच्या चालकाला मारहाण करत अज्ञात हल्लेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला होता. सुमारे 1 कोटी 10 लाखांची रक्कम लंपास करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. केवलानी यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून हा लुटीचा प्रकार करण्यात आला होता. केवलानी हे द्राक्ष व्यापारी असून द्राक्ष खरेदी केल्यानंतर तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी 1 कोटी 10 लाखांची रक्कम ते घेऊन आले असता अज्ञात चोरट्यांनी गाडी अडवून मारहाण करत ही रक्कम लुटली.
वाचा - खून का बदला खून! तंटामुक्त अध्यक्षाच्या पोरानं केली चुलत्याची हत्या
या घटनेनंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके नेमली. जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करुन तपास सुरू करण्यात आला. दरम्यान तासगाव तालुक्यातील याच मनेराजुरी येथील शिकोबा डोंगराच्या पायथ्याला काही संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे काही शस्त्र आणि रोकड आढळून आली. तिघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम ही तासगाव शहरातल्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून लुटल्याचं सांगितले. यावेळी त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. नितीन यलमार (वय वर्ष 22), विकास पाटील (वय 32) आणि अजित पाटील (वय 22) असे तिघा संशयितींची नावे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.