सांगली, 10 जानेवारी : नवीन वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आज मंगळवारी आहे. आजच्या दिवशी गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. सांगलीतील कृष्णातीरावरील गणेश मंदिर तब्बल दोन शतके सांगलीकरांच्या सुख-दु:खाचा साक्षीदार बनून राहिले आहे. या प्राचीन कालीन मंदिराचे सौंदर्य लुभावणारे आहे. दगडी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून अभ्यासकांना आकर्षित करणारे हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे प्रसिद्ध आहे. काय आहे मंदिराचा इतिहास आणि वैशिष्ट्ये पाहुयात.
चिंतामणराव पटवर्धनांनी कृष्णा नदीकाठी 1814 मध्ये गणेश मंदिराची उभारणी सुरू केली. ती पुढे तीस वर्षे सुरू होती, असे सांगितले जाते. मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. प्रत्येक वर्षी येणाऱ्या अंगारकी संकष्टीला सर्वधर्मीय भाविकांची मंदिरात मोठी गर्दी असते.
सांगलीच्या गणपती मंदिराचा इतिहास पाहिला तर दोनशे वर्षाहून अधिक काळ मागे जावे लागते. मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव पटवर्धन या चुलते आणि पुतण्यामध्ये सन 1799 मध्ये वाटणी झाली. चिंतामणराव मिरजेतून बाहेर पडले आणि सांगलीत नवी राजधानी करण्याचे ठरवले. गणेशदुर्ग हा भुईकोट किल्ला बांधायला सुरुवात केली. तसेच आराध्यदैवत श्री गणपतीचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला.
सन 1811 मध्ये कृष्णाकाठावर गणेश मंदिराचे बांधकाम सुरू झाले. सन 1814 मध्ये पायाभरणी झाली. 30 वर्षानंतर काम पूर्ण होऊन भव्य आणि आकर्षक गणपती मंदिर साकारले. मंदिराच्या बांधकामासाठी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराचा नकाशा आणि जोतिबाच्या डोंगरातून काळा पाषाण आणला. अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती बनविण्यात आल्या.
1845 मध्ये चैत्र शुद्ध दशमीला मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजाअर्चा विधी झाला. संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह श्री गणेशाची आकर्षक मूर्ती, मंदिराभोवती श्री चिंतामणेश्वर हे महादेवाचे मंदिर, चिंतामणेश्वरी हे देवीचे मंदिर, श्री सूर्यनारायण मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी चार मंदिरे असून हे मंदिर म्हणजे सांगलीकरांचे श्रद्धास्थान आहे. सध्या सांगली संस्थानचे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणपती पंचायत ट्रस्टचे कामकाज पाहिले जाते. आज चैत्र शुद्ध दशमीला 178 वर्षे पूर्ण झाली.
उभारणीस तब्बल 30 वर्षांचा कालावधी
मंदिराच्या प्रवेशद्वाराला लाल दगड वापरला तर मुख्य गाभारा आणि पंचायतनच्या मंदिरासाठी काळा घडीव दगड वापरला. या मंदिराच्या उभारणीस तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागल्याचे समजते. शेकडो मजूर रात्रंदिवस या मंदिराच्या उभारणीच्या कामासाठी कष्ट करीत होते. वेगळ्या धाटणीच्या या मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर1845 मध्ये चैत्र शुद्ध दशमीला या मंदिराचा अर्चा विधी झाला.
माजी पंतप्रधान ते सचिन तेंडुलकर अनेकांचं श्रद्धास्थान असलेलं गणेश मंदिर, Video
मंदिरातील पंचायतनच्या पाच मूर्ती भिमण्णा आणि मुकुंदा पाथरवट या स्थानिक कारागिरांकडून बनवून घेण्यात आल्या. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1847 मध्ये मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करण्यात आले.1847 मधील मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
मंदिरासाठी जमिनी इनाम
गणपती पंचायतनच्या खर्चासाठी संस्थानाच्या विविध गावांतील जमिनी इनाम दिल्या होत्या. गणेश मंदिराच्या आसपासचा परिसर यामुळे गेल्या 150 वर्षांपासून विकास पावत गेला. याच गणेशाच्या नावाने सांगलीची बाजारपेठ वसली. 1952 मध्ये या गणेश मंदिरासमोर लाल रंगातील दगडाची कमान उभारण्यात आली. दुसऱ्या चिंतामणरावांच्या काळात या मंदिराची उर्वरित कामे पूर्ण करण्यात आली.
गणपती पंचायतन
मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. मंदिरात संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह असलेल्या गणेशाची मूर्ती सुबक आहे. मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर हे महादेवाचे, चिंतामणेश्वरी हे देवीचे, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे आहेत. या चार व एक मुख्य मंदिर असे गणपती पंचायतन म्हणून ओळखले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.