असिफ मुरसल, प्रतिनिधी
सांगली, 25 मार्च : सांगलीमध्ये मन हेलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. बेडग येथील शासकीय शेत तलावात पडून दोन सख्ख्या लहान भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, एकच घरातील सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागरगोजे वाडी सनदी वस्ती याठिकाणी शासकीय तलाव आहे. या तलावात पाच ते सहा फूट पाणी असल्याने या ठिकाणी दोन लहान मुले खेळत खेळत गेले असता तोल जाऊन पाण्यात बुडाल्याची घटना घडली. आयाज युनूस सनदी (वय 10), आफान युनूस सनदी (वय 7) अशी मृत मुलांची नाव आहे.
हे दोघेही भाऊ जिल्हा परिषद शाळा नागरगोजे वाडी येथे तिसरी पहिली आणि पहिलीमध्ये शिकत होते. आज शाळेत जाऊन घराकडे परत येत होते. तेव्हा घराच्या काही अंतरावर हे शासकीय तलाव आहे. या तलावाजवळ आय्याज आणि अफान हे दोघे खेळण्यासाठी गेले. पण तलावा शेजारून जाताना लहान भावाचा पाय घसरला आणि तो पडला, त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने पाण्यात उडी घेतली.
(शाळेतून घरी जाताना भयंकर घडलं, ट्रकने नात आणि आजोबाला चिरडलं, भंडारा हादरलं)
घाबरलेल्या लहान भावाने मोठ्या भावाला मिठी मारली आणि दोघेजण ही पाण्यात बुडाले. दोघे भाऊ बुडत असल्याचे काही मुलांनी पाहिले ही घटना नातेवाईक आणि परिसरात समजली. मुलांना पाण्यातून बाहेर काडण्यासाठी सर्वांनी तलावाकडे धाव घेतली होती. तलावात पाणी पाच ते सहा फूट असल्याने बुडालेल्या दोघा मुलांना बाहेर काढण्यात आले. या दोन्ही मुलांची शरिराची हालचाल पूर्ण बंद पडली होती. त्यांना तत्काळ सरपंच उमेश पाटील यांच्या रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. पण या दोन्ही मुलांचा उपचारपूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
या घटनेमुळे सनदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन भावांचा मृत्यू झाल्यामुळे मिरज तालुक्यात हळूहळू व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.