पठाण कुटुंबियांनी धर्माची बंधनं झुगारून केलं गाईचं डोहाळे जेवण!

पठाण कुटुंबियांनी धर्माची बंधनं झुगारून केलं गाईचं डोहाळे जेवण!

धर्माच्याही पलिकडे जावून गाईवर निस्सिम प्रेम करणाऱ्या सांगलीतल्या पठाण कुटुंबियांनी आपल्या गाईचं कोडकौतूक करत तिचं डोहाळ जेवण दिलं.

  • Share this:

आसिफ मुरसल, सांगली, 30 सप्टेंबर - गाय हा आपल्या देशात सध्या संवेदनशील विषय बनलाय. कारण काही लोकांनी तिच्याभोवती धर्म जोडलाय. पण धर्माच्याही पलिकडे जावून गाईवर निस्सिम प्रेम करणाऱ्या सांगलीतल्या पठाण कुटुंबियांनी आपल्या गाईचं कोडकौतुक करत तिचं डोहाळे जेवण दिलं.

जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी गावात शहाबुद्दीन पठाण राहतात. तीन वर्षांपूर्वी लोकरेवाडीतल्या डोंगराळ भागात जनावरे चरावयास नेलेली असताना त्यांना एक जखमी असलेलं गाईचं एक वासरू आढळून आलं. जनावरं सांभाळण्याची त्याना पहिलेपासूनच हौस. त्यामुळे त्यांनी त्या वासराला खांद्यावर घेतलं आणि घरी आणलं. डॉक्टरांना बोलावून त्याच्यावर उपचारसुद्धा केलेत. शहाबुद्दीन यांच्या पत्नी सलीम यांनी मोठ्या लाडानं त्या गाईच्या वासराचं 'धनश्री' असं नाव ठेवलं.

'धनश्री' आज मोठी झाली असून, लवकरच ती एका वासराला जन्म देणार आहे. शहाबुद्दीन यांनी 'धनश्री'ला आई मानलंय. गर्भारपणात ज्याप्रमाणे स्रीयांचं डोहाळे जेवळ केलं जातं, त्याच प्रमाणे 'धनश्री'चं कोडकौतुक करण्याचा निर्धार शहाबुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला. संपूर्ण गावाला 'धनश्री'चं डोहाळे जेवण देण्याचं त्यांनी ठवरलं. त्यासाठी शहाबुद्दीन यांनी बचत गटातून 35 हजाराचं कर्ज देखील काढलं.

रविवारी शहाबुद्दीन यांच्या अंगणात 'धनश्री' या त्यांच्या लाडक्या गाईचा डोहाळे जेवणाचा सोहळा पार पडला. दारात मोठा मांडव घालण्यात आला. वाजंत्री म्हणून बँड-बाजेवालेही आलेत. एखाद्या नव्या नवरीप्रमाणे 'धनश्री'चा साज श्रृंगार करण्यात आला. डोळ्यात काजळ, गळ्यात कंडा, हार, साडी, बांगड्या, गोंडा, म्होरकी, कासरे, अश्या सर्व साहित्यानं तीला नटवण्यात आलं होतं. मग काय, हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी हजेरी लावली. पाहुणे म्हणून आलेल्या काही महिलांनी तर 'धनश्री'साठी आहेर देखील आणला होता. कोणी साडी आणली, तर कोणी टॉवेल-टोपी. कार्यक्रम सुरू होताच उपस्थित काही वृद्ध महिलांनी डोहाळे जेवण्याची गाणीसुद्धा गायली.

हौसेला मोल नसतं असं म्हणतात. महागाईच्या या काळात शहाबुद्दीन यांनी बचत गटातून कर्ज काढून मुक्या जीवावराप्रती दाखवलेलं प्रेम हे नक्कीच सर्वासाठी प्रेरणादायी आहे. पठाण कुटुंबियांनी धर्माच्या पलिकडे जाऊन साजरा केलेला हा गाईच्या डोहाळे जेवणाचा सोहळा फक्त हौसेपुरताच मर्यादीत नव्हता, तर गाईला एका विशिष्ठ धर्माशी जोडू पाहणाऱ्यांना एक चपराक होती असं म्हणावं लागेल.

 पाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO

First published: September 30, 2018, 3:23 PM IST

ताज्या बातम्या