सांगली 15 मे: सांगलीत भटक्या कुत्र्यांचा (Stray dogs) वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी सकाळी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आपल्या नेहमीच्या कामासाठी प्रभाग क्रमांक 19 मध्ये गेले होते. दरम्यान काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला (stray dogs attack on Municipal Corporation employee) केला आहे. या हल्ल्यात संबंधित मनपा कर्मचाऱ्याला मोठी दुखापत झाली असून कुत्र्यांनी त्यांना रक्तबंबाळ केलं आहे. या घटनेनंतर त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रेबीज विरोधी उपचार करण्यात आले आहेत.
संबंधित जखमी मनपा कर्मचाऱ्याचं नाव श्रीकांत मद्रासी असून ते सांगली महानगर पालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे ते प्रभाग क्रमांक 19 याठिकाणी गेले होते. यावेळी त्यांना रस्त्यावरील काही भटक्या कुत्र्यांनी अचानक घेरलं. यावेळी श्रीकांत यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तसेच कुत्र्यांना लांब हाकलण्याचाही प्रयत्न केला. पण या टोळीतील चवताळलेल्या एका कुत्र्यानं मद्रासी यांच्यावर झेप घेतली आणि त्यांना खाली पाडलं. खाली पडल्यानंतर या कुत्र्यानं त्यांच्या चेहऱ्यावर चावा घेतल. तसेच संपूर्ण शरीराचे लचके तोडले.
दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही काळापासून सांगली, मिरज आणि कुपवाड या परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. यापूर्वीही मिरज शहरात अनेकदा भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केला आहे. यामध्ये काही लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. तर काही जणांचा मृत्यूही झाला होता. लहान मुलं आणि नागरिकांवर हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनेकदा स्थानिक नागरिकांनी केली आहे. पण महापालिकेसोबतचं आरोग्य विभागही याकडे कानाडोळा करताना दिसले आहेत.
हे ही वाचा-Dogecoin ची कमाल! 33 वर्षीय तरुणाने अवघ्या 4 महिन्यात कमावले कोट्यवधी
आता पुन्हा एकदा कुत्र्यानं हल्ला केल्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिका कर्मचार्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर आता तरी महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.