धक्कादायक! दागिने लुटण्यासाठी चोराने केला 80 वर्षाच्या वृद्धेचा खून, परिसरात खळबळ

धक्कादायक! दागिने लुटण्यासाठी चोराने केला 80 वर्षाच्या वृद्धेचा खून, परिसरात खळबळ

या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 19 जानेवारी : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात भरदिवसा गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका 80 वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला आहे. सावित्राबाई मोगल शेळके असं या खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

कौठेकमळेश्वर गावात संगमनेर रस्त्याच्या जवळ सावित्राबाई मोगल शेळके ही वृद्धा राहत होती. तिचे घराजवळ गोळ्या बिस्कीटचे छोटे दुकान असून ती शिवणकाम व्यवसाय करत होती. दरम्यान ती मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्याने तिच्या घरात प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने सदर वृद्धेचा गळा दाबून खून केला.

दरम्यान नजीकच राहणारी एक पाच वर्षाची बालिका गोळ्या घेण्यासाठी त्या ठिकाणी आली असता तिने सदर प्रकार बघितला. त्यानंतर चोरट्याने सदर बालिकेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबडले व तिच्या अंगावर गोधड्या व कापडे टाकून झाकले. दागिने ओरबडल्याने कान जखमी झालेली व घाबरलेली मुलगी त्यानंतर आजी - आजी म्हणत तिच्या नजीकच्या घराकडे पळाली. तोपर्यंत अज्ञात चोरटा पसार झाला होता. नजीकच्या रहिवाशांनी सदर वृद्धेच्या घराकडे धाव घेल्याववर संपूर्ण प्रकार उघड झाला.

स्थानिक रहिवाशांनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आलं. घटनेचे गांभीर्य लक्षात पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहून मदने, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी ठसे तज्ञांचे पथक व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार अधिक तपास करीत आहे. चोरटा एक होता की एकापेक्षा अधिक याचा शोध पोलीस घेत आहेत. भरदिवसा दुपारच्यावेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने वृद्धेचा गळा दाबून खून करण्याची घटना घडल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 19, 2021, 9:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या