समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव द्या, एकनाथ शिंदेंच्या मागणीवर बैठकीत एकमत

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव द्या, एकनाथ शिंदेंच्या मागणीवर बैठकीत एकमत

सरकारकडून येत्या काही दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, अशी मागणी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. या मागणीला इतर मंत्र्यांनीही सहमती दाखवली आहे. मात्र याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सरकारकडून येत्या काही दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी असा मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचा प्रकल्प आता वेगळ्याच वादात अडकला आहे. महामार्गाचे काम गतीने सुरू नसले तरी त्याच्या नावावरून वातावरण तापताना दिसत आहे. या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावं असा प्रस्ताव भाजपने दिला होता. आता त्याऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

कसा असेल समृद्धी महामार्ग?

मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील 710 किमी अंतराचा प्रवास फक्त 6 तासात या महामार्गामुळे होणार आहे. यासाठी सुमारे 56 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. तीन वर्षात महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातील 27 तालुक्यातल्या 350 गावांमधून जाणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी मंत्रीमंडळ बैठकीवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. देशात पहिल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावं असं शिवसेनेनं म्हटलं होतं. त्यानंतर नावाचा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, शिवसेनेच्या या मागणीनंतर आधीच या महामार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाद कशाला? दबावाचं राजकारण करू नका असंही फडणवीस यांनी सेना नेत्यांना सुनावलं होतं. तेव्हा बाळासाहेबांचे नाव महामार्गाला दिले नाही तर राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेनं दिला होता.

Published by: Akshay Shitole
First published: December 11, 2019, 5:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading