मुंबई, 11 मे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात आरोप प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या (CM) नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळानं मंगळवारी राज्यपालांची (Governor) भेट घेऊन राष्ट्रपतींना (President) पत्र दिलं. या पत्राद्वारे भावना मांडल्याचं मुख्यमंत्र्यंनी भेटीनंतर सांगितलं. पण यानंतर काही वेळातच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी एक सूचक ट्विट केल्यानं, त्याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.
(वाचा-मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळ राज्यपालांच्या दारी)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळानं मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाबाबत निर्णय देताना आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नसून राष्ट्रपती किंवा केंद्राचा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं राष्ट्रपतींना विनंती करण्यासाठी आणि पत्राच्या माध्यमातून भावना पोहोचवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी देखील आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले असून ते केंद्राला आमच्या भावना कळवतील, असं उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
(वाचा-Corona रोखण्यासाठी अहिल्याबाईंची पुजा करणाऱ्या मंत्र्यांचा आणखी एक अजब सल्ला)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती आणि केंद्राकडे भावना पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं. पण यानंतर काही वेळातच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक सूचक ट्विट केलं. लाखोंचे मोर्चे भावना व्यक्त करणारेच होते! आता आवश्यकता आहे ती, ठाम भूमिकेची आणि समन्वयातून मार्ग काढण्याची असं या ट्विटद्वारे संभाजीराजेंनी म्हटलं आहे. त्यामुळं संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना ठाम भूमिका घेण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
लाखोंचे मोर्चे भावना व्यक्त करणारेच होते !
आता आवश्यकता आहे ती, ठाम भूमिकेची आणि समन्वयातून मार्ग काढण्याची.#मराठा_आरक्षण — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 11, 2021
मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाला धक्का देणारा निर्णय आल्यानंतरही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी सर्वच सरकारांनी मराठा आरक्षणसाठी प्रयत्न केल्याचं म्हटलं होतं. तसंच आता समन्वयातून यावर तोडगा काढावा लागेल असंही ते म्हणाले होते. मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली आहे. त्यामुळं राज्य सरकारनं ठाम भूमिका घेण्याची सूचना आता केली जात असल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati, Uddhav tahckeray