असिफ मुरसल, प्रतिनिधीसांगली, 28 जानेवारी : राज्य सरकारने महसूलमध्ये वाढ व्हावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी वाईन मोठ-मोठ्या शॉपी, मॉल आणि किराणा दुकानात विकण्यास परवानगी दिली आहे. पण ज्या दुकानांचं क्षेत्रफळ एक हजार चौरसफुट आहे, अशाच दुकानांना वाईन विकता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत याबाबतचा निर्णय (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला आहे. पण राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी विरोध केला आहे. या निर्णयावरुन त्यांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच किराणा दुकानांना दारु विक्रीस परवानगी दिली मग अफू-गांजाच्या शेतीला नाही कसे म्हणायचे? असा उपरोधिक सवाल संभीजी भिडे यांनी केला आहे.
"लोकशाहीत विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य अशी 10 प्रकारची स्वातंत्र्ये आहेत. महाराष्ट्र सरकारने प्रगतीचे पाऊल पुढे टाकले आहे. विकासासाठी, राज्याची अर्थव्यवस्था मजबूत पाहिजे त्यासाठी फार मोठे प्रगतीचे काम केले आहे. दारु प्राशन केलेल्या यादवांच्यात भांडणे हाणामारी झाली. श्रीकृष्णने स्वतः मुसळ घेऊन त्यांचा संहार केला. तसाच दारू कुठेही मिळणार हा निर्णय नाश करणारा निर्णय आहे. जुगार खेळताना पांडवांचे राज्य गेले, भीम रागावला, प्रतिज्ञा केली तसा राग येणारा भीम आता नाही", अशा शब्दांत संभाजी भिडेंनी खंत व्यक्त केली.
"आर आर आबांची आज आठवण येते. त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली. ते आज हयात असते तर हा निर्णय झाला नसता. तुकोबा-ज्ञानेश्वर यांचा हा आत्म उद्धार करणारा आपला समाज. तसेच आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या संघटनानी या निर्णयासाठी पेटून उठले पाहिजे. एक मराठा लाख मराठा या घोषणेचा अभिमान वाटतो. मराठा क्रांती मोर्चाने या निर्णय विरोधात आंदोलन केले पाहिजे. हा निर्णय गलिच्छ आहे. एकही आमदार-मंत्री या निर्णयावर थुंकतो, असे म्हणून बाहेर पडला नाही. लिव्ह आणि रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना पण संपवलं पाहिजेल", असं संभाजी भिडे म्हणाले.
(नोकरी सोडा अन् सुरू करा 'हा' व्यवसाय,महिन्याला कमवाल 5 लाख रुपये, जाणून घ्या कसे)
"हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. हा काही परराष्ट्राने लादलेला निर्णय नाही. मी मुंबईला नाईट लाईफ देणार आहे, असे म्हणणारे देश राज्याला व्यभिचाराच्या दिशेने नेणारे आहेत. अफू गांजा यांची शेती करायला मग नाही कसे म्हणायचे? या सगळ्याला आम्ही विरोध करणार आहोत. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळाशी बोलणार आहोत. सर्व पंथ, गटतट यातील साधूंनी उठून कामाला लागायची गरज आहे", असं आवाहन भिडे यांनी केलं.
"राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मी सांगणार आहे, हे मंत्रिमंडळ बरखास्त करून टाका. हा तुमचा अधिकार आहे. पंतप्रधानांनी घटनेत दुरुस्ती करुन दारुला तिलांजली देण्याचा निर्णय घ्यावा. सर्वात चांगले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. लालबहादूर शास्त्री सारखा मोदींचा कारभार आहे. मोदींनी दारु बंदीचा निर्णय घ्यावा", असंदेखील ते यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.