संभाजी भिडेंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, राजकीय समीकरणांवर खलबतं?

संभाजी भिडेंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, राजकीय समीकरणांवर खलबतं?

संभाजी भिडे यांनी आता वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे मातोश्रीवर जाऊनही त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली नाही. मातोश्रीवरून रिकाम्या हाती परतल्यानंतर संभाजी भिडे यांनी आता वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे. कारण प्रसारमाध्यमांशी न बोलता संभाजी भिडे निघून गेले. मात्र एकीकेड संभाजी भिडे यांच्या मध्यस्थीला शिवसेनेनं दाद दिली नसताना भिडे यांनी मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

संभाजी भिडेंना शिवसेनेनं फटकारलं

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य केलं आहे. 'राष्ट्रपती राजवटीच्या आडून राजकारण हा राज्यातील जनतेचा अपमान आहे,' अशी टीका भाजपवर संजय राऊत यांनी केली आहे. तसंच मध्यस्थीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही फटकारलं आहे.

'शिवसेनेला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. सर्व कथित आणि तथाकथित मध्यस्थांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप आहे की कुणीही मध्यस्थी करू नये. हा विषय भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधला आहे, यात तिसऱ्याने मधे पडण्याची गरज नाही,' असं म्हणत संजय राऊत यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

दरम्यान, राज्यात सध्या शिवसेना-भाजपमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे. या सगळ्या धामधुमीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच संभाजी भिडे यांना मातोश्रीवरून काढता पाय घ्यावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांची वाट पाहिली पण ते मातोश्रीवर न परतल्यामुळे संभाजी भिडे तिथून निघून गेले.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

Published by: Akshay Shitole
First published: November 8, 2019, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading