तीक्ष्ण हत्यार घेऊन आला होता चोरटा, विदर्भाच्या महिला क्रिकेटपटूने शिकवला चांगलाच धडा

तीक्ष्ण हत्यार घेऊन आला होता चोरटा, विदर्भाच्या महिला क्रिकेटपटूने शिकवला चांगलाच धडा

गिट्टीखदान पोलिसांनी सलोनीच्या हिंमतीला दाद देत या धाडसाबद्दल तिचं कौतुक केलं

  • Share this:

प्रशांत मोहिते, प्रतिनिधी

नागपूर, 26 फेब्रुवारी : विदर्भाची युवा महिला क्रिकेटपटू सलोनी अलोट ही तिच्या मैदानावरील धमाकेदार कामगिरीसाठी संपूर्ण विदर्भात लोकप्रिय आणि परिचित आहे. मात्र, रविवारी पहाटे नागपुरकरांना तिचे वेगळेच रुप पाहायला मिळालं. सलोनीनं चक्क एका चोरट्याचा धैर्यानं सामना करीत, त्याला पोलिसांच्या स्वाधीन करून समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला.

गिट्टीखदान पोलिसांनी सलोनीच्या हिंमतीला दाद देत या धाडसाबद्दल तिचं कौतुक केलं. गिट्टीखदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी कॉलनीत राहणारी सलोनी आपल्या आईवडिलांसह कारने शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गिट्टीखदान परिसरातच राहणाऱ्या आपल्या मामाकडे एका कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम आटोपून रविवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास ती घरी परतली.

सलोनी घराच्या बाजूला कार पार्क करीत असताना अचानक अंधारात फुलांच्या कुंडीजवळ काहीतरी हालचाल झाल्याचे दिसून आलं. ती जवळ गेली असता चोरीच्या उद्देशने आलेला एक भामटा नजरेस पडला. घाबरलेल्या चोरट्याने 'वॉल कंपाऊंड वरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलोनीने त्याच्यावर

वाघिणीसारखी झडप घालून चोरट्याला पकडून ठेवलं. सलोनीच्या आईवडिलांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले. लगेच गिट्टीखदान पोलिसांना फोन करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोरट्याला ताब्यात घेतलं. या झटापटीत सलोनीच्या दोन्ही हातांना जखम झाली. परंतु, तिने चोरट्याला सोडलं नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गांगुडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिवाय सलोनी दाखविलेल्या धाडसाबद्दल तिचं कौतुकही केलं. अंधाऱ्या रात्री चोरट्याचा हिंमतीने सामना करणे याला खूप हिंमत लागते, खेळाडू होती म्हणूनच ती अशी हिंमत करू शकली, असं पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे म्हणाले.

या धाडसी कामगिरीबद्दल कॉलनीतील नागरिकांनी सलोनीची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे. धनराज पंचेश्वर (बालाघाट) असं चोरट्याचं नाव आहे. धनराजला पकडले त्यावेळी त्याच्याजवळ आरी, पेचकस आणि अन्य तीक्ष्ण साहित्य होते.

सलोनी ही केमिकल इंजिनिअरिंग करीत असून विदर्भ महिला क्रिकेट संघात यष्टीरक्षक असून, २०१८-१९ च्या मोसमात तिने २६ सामन्यांमध्ये  यष्टीरक्षकमागे ३७ बळी टिपले होते.

First published: February 26, 2020, 6:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या