नवी दिल्ली, 17 मार्च : मुंबईतील हाय प्रोफाइल भागात सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) याला अटक करण्यात आल्यामुळे राज्य सरकारची मोठी अडचण झाली आहे. या मुद्द्यावरूनच मुंबई पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. मात्र या घडामोडीनंतरही भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांनी सरकारविरोधात पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.
नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं नाव घेत सचिन वाझे याच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. 'वसुलीच्या रॅकेटमध्ये सचिन वाझे यांचं नाव आलं होतं. अशा स्थितीतही मी मुख्यमंत्रिपदी असताना सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे हे माझ्यासोबत बोलले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता,' असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
'शिवसेनेसोबत सचिन वाझे याचे अतिशय जवळेचे संबंध होते. एवढंच नाही तर अनेक नेत्यांसोबत त्याचे व्यवसायिक संबंध होते. हे सर्व सचिन वाझे एकटा करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत काही जण आहेत. हे एका पोलीस अधिकाऱ्याचं काम नाही, तर सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती पत्रकार परिषद :
- माझ्या सारख्या व्यक्तीकडे जितके पुरावे आहेत त्यापेक्षा जास्त पुरावे एटीएसकडे आहेत.
- आमची मागणी आहे की हे संबंधित प्रकरण आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची आवशकता आहे
- मनसुख हिरेन प्रकरणात अतिशय विचारपूर्वक या घटनेची रचना करण्यात आली. आम्हाला वाटते की त्यांची हत्या करण्यात आली, त्यानंतर त्यांचे पार्थिव खाडीत फेकण्यात आलं
- मुंबई पोलीस आयुक्तांनंतर सर्वात मोठी उंची सचिन वझे यांची होती
- वाझे यांची वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असं वाटत होतं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.