'ठोकून काढा! मोदीजी विरोधकांवरचे हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे बघा'

'ठोकून काढा! मोदीजी विरोधकांवरचे हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे बघा'

पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकार जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी काय करणार? शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला ठोकून काढा म्हणत या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शिवसेनेने सामनामधून केली आहे. पुलवामा हल्ल्यात 37 जवानांना वीरमरण आले. ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर जवान आणि शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा राहण्याची वेळ असल्याचे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.  मोदींनी पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवून पाकिस्तानवरील हल्ल्यांकडे पहावे असेही अग्रलेखात म्हटले आहे.

सामना अग्रलेख

दहशतवादी हल्ल्यात आपल्या 40 जवानांनी बलिदान दिले आहे. कश्मीरची भूमी पुन्हा एकदा हिंदुस्थानी जवानांच्या रक्ताने भिजली आहे. कश्मीर आमचे आहे असे गेल्या सत्तर वर्षांपासून घशाच्या शिरा ताणून सांगितले जात आहे. त्या आमच्या कश्मीरात आमच्याच जवानांच्या हत्या का सुरू आहेत? पंडित नेहरूंपासून आज नरेंद्र मोदींपर्यंत परिस्थिती बदलण्याऐवजी बिघडतच चालली आहे व कालच्या ‘पुलवामा’ हल्ल्याने देश हादरला आहे, आक्रोश करीत आहे. हिंदुस्थानी लष्करावर आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या सर्वात मोठय़ा हल्ल्याने राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नेहमीप्रमाणे हा हल्ला भ्याड असल्याच्या सरकारी आणि राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर आणि सशस्त्र फौजफाटय़ांवर हल्ला करणे व आमचे अतोनात नुकसान करणे यास ‘भ्याड’ हल्ला कसे काय म्हणू शकता? आमच्या अति आणि फाजील आत्मविश्वासावर केलेला हा हल्ला आहे. लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. संसदेचे शेवटचे सत्र संपले आहे. संपूर्ण सरकार भाषणबाजीत, आरोप-प्रत्यारोपात मश्गूल आहे. उद्याच्या निवडणुकांत कसे व कोणत्या मार्गाने जिंकून पुन्हा दिल्लीत यायचे या ‘पत्तेपिसी’त सगळेच दंग आणि गुंग असताना हा भयंकर हल्ला झाला आहे. 350 किलो आरडीएक्स भरलेली कार जवानांच्या ताफ्यात घुसवली व जैश-ए-मोहम्मदने तालिबानी पद्धतीचा आत्मघाती हल्ला केला. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाटांनी काय होणार? देशात अशा लाटा कधी संतापाच्या असतात तर कधी राजकीय विजयोन्मादाच्या असतात. त्या

लाटांच्या तडाख्यांनी

ना कश्मीर प्रश्न सोडवला ना जवानांची बलिदाने रोखली. जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. म्हणजे ते नेमके काय व कसे करणार आहेत? पुलवामामधील जवानांच्या हत्याकांडाचा म्हणे जगभरातून निषेध केला जात आहे. प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही निषेधाचे अश्रू ढाळले आहेत. मालदीव, श्रीलंकेसारखी राष्टे^ही निषेध करीत आहेत. या निषेधबाजीतच आपण आनंद मानायचा काय? आमच्या जवानांच्या चिंधडय़ा कश्मीरच्या भूमीवर रोज उडत आहेत. जवानांची कुटुंबे निराधार, पोरकी होत आहेत व त्याचे खापर पाकडय़ांवर फोडून आम्ही निवडणुकांच्या रणमैदानात उतरत आहोत. राजकीय विरोधकांवर ‘सर्जिकल ऍटॅक’ करण्यापेक्षा पाकिस्तानसारख्या सैतानी राष्ट्रावर हल्ला करून जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे. ‘उरी’चा हल्ला भयंकर होता, त्यापेक्षा ‘पुलवामा’चा हल्ला खतरनाक आहे. उरीत लष्करी तळावर अतिरेकी घुसले व झोपेतल्या जवानांवर हल्ला केला, पठाणकोटमध्ये एअर बेसवर हल्ला केला, अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला झाला. असे हल्ले थांबले नाहीत, जवानांच्या हत्या थांबल्या नाहीत. कश्मीरचा प्रश्न आधी होता त्यापेक्षा चिघळला आहे. पाकिस्तानात एक कमजोर आणि हिंदुस्थानद्वेषी सरकार एखाद्या बाहुल्याप्रमाणे बसले आहे. इम्रान खान हे नावाचेच पंतप्रधान असून आयएसआय व मसूद अजहरसारख्या दहशतवादी संघटनाच ‘पाकिस्तान’ नामक दहशतवादी घडविण्याची ‘कार्यशाळा’ चालवीत आहेत. आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा पाकिस्तान भिकेला लागला असला तरी त्याच्या भिकेच्या कटोऱयात ‘दान’ टाकणारे चीनसारखे देश आहेत. चीन डोकलाममध्ये घुसले आहे व पाकडय़ांचे अतिरेकी सैन्य कश्मीरात आकांत घडवीत आहे. आम्ही मात्र एका वेगळ्याच राजकीय धुंदीत,

अजेय व अजिंक्य आहोत

अशा थाटात वावरत आहोत. उरी हल्ल्याचा बदला म्हणून एक ‘सर्जिकल स्ट्राइक’ नावाचा प्रयोग केला. त्या सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तान व त्याच्या अतिरेकी बगलबच्च्यांना धडा मिळाला असे ढोल वाजवले, पण ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातील शौर्याचे सर्व श्रेय घेऊनही कश्मीरात हल्ले व पाकडय़ांचा अतिरेकी प्रकार थांबलेला नाही. ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा मसूद अजहर सारख्यांना धडा शिकविण्यास पुरेसा नाही. आधी सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय ते नीट समजून घ्या. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला दोन तासांत खतम केले. त्याला म्हणतात सर्जिकल स्ट्राइक! तालिबानच्या म्होरक्यांना त्यांच्या घरात घुसून अमेरिकेने मारले, पण प्रे. ट्रम्प आज कश्मीरातील हल्ल्यांचा फक्त निषेध करीत आहेत. ट्रम्प हे मोदींचे सच्चे दोस्त असतील तर त्यांनी ‘लादेन’प्रमाणेच मसूद अजहरचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेचे कमांडोज पाकिस्तानात घुसवायला हवेत. दहशतवादाचे उच्चाटन पाकिस्तानच्या भूमीवरून करायचे असेल तर हाच एकमेव मार्ग आहे. श्रीलंकेच्या सरकारने ज्या प्रकारे ‘लिट्टे’चे नामोनिशाण मिटवले व आपला देश दहशतवादमुक्त केला, ती हिंमत व जिगर आमच्या राजकारण्यांत असेल तर शंभर पाकिस्तानचा नायनाट करता येईल. पंतप्रधान मोदी यांनी कठोर कारवाईची भाषा केली. पठाणकोट व उरी हल्ल्यांनंतरही ती केलीच होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला ‘एकटे’ पाडण्याची कूटनीती कशी यशस्वी झाली यावरही सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली, पण त्यातून पाकिस्तानचे शेपूट सरळ झाले का, तर अजिबात नाही. ‘एकटा’ पडलेला पाकिस्तान हिंदुस्थानात घुसून आमच्यावर भयंकर हल्ले करीत आहे. मोदी यांना आमचे हात जोडून एकच सांगणे आहे, पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे पहा. बदला घेण्याची भाषा केलीच आहे, ती कृतीत उतरवून दाखवा. पाकिस्तानला ठोकून काढा! ठोकून काढा!! ही राजकारण करण्याची वेळ नाही. जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे.

First published: February 16, 2019, 7:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading