मुंबई, 11 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज विरोधकांची टीका म्हणजे ‘चिखल’ वाटत आहे, पण मागील आठ वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने विरोधकांवर कोणता ‘गुलाल’ उधळला? फक्त चिखलफेकच केली. आता तुमच्यावर चिखलफेक सुरू झाली म्हणून तुम्ही ‘चिखल’, ‘गुलाल’ आणि ‘कमळ’ हे यमक जुळवले. मात्र तुमचेही पाय ‘चिखला’चेच आहेत हे ‘गमक’ विसरू नका. तुम्ही विसरलात तरी जनता त्याची आठवण योग्यवेळी तुम्हाला करून देईलच, अशी टीका शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत आणि गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या भाषणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून टीका करण्यात आली आहे.
' ‘चिखल’ आणि ‘कमळ’ यांचा त्यांनी उल्लेख केला. ‘किचड उनके पास था, मेरे पास गुलाल! जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल,’ असे पंतप्रधानांनी मोठय़ा शायराना अंदाजामध्ये सांगितले. ‘तुम्ही तेवढा जास्त चिखल उडवाल, तेवढे कमळ अधिक फुलेल,’ असेही ते म्हणाले. , पण या ‘यमका’पलीकडील ‘गमका’चे काय? चिखल आणि कमळ हे यमक जुळवायला, बोलायला, टाळय़ा मिळवायला ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या भाषणात गांधी-नेहरू घराणे, काँग्रेस पक्ष आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्याविषयी जे बोललात ते काय होते? तुमच्याजवळ गुलाल होता आणि तो तुम्ही उधळला अशी बढाई तुम्ही मारली खरी, परंतु तुमच्याजवळही चिखलच होता आणि तोच तुम्ही फेकला. काँग्रेस पक्षासंदर्भात परकीय विद्यापीठात झालेल्या कुठल्या तरी ‘संशोधना’चा तुम्ही केलेला उल्लेख हा कोणत्या ‘गुलाला’चा प्रकार होता? असा सवाल शिवसेनेनं थेट मोदींना विचारला.
एकीकडे हिंदुस्थानची उभारणी अनेक पिढ्यांच्या श्रमातून आणि घामातून झाली असे सांगायचे आणि दुसरीकडे आधीच्या सरकारांनी देशाचे वाटोळे केले, असा चिखल फेकायचा. पंडित नेहरू महान होते असेही म्हणायचे आणि नेहरू-गांधी घराण्याच्या नावाने बोटेही मोडायची. कलम 370 वरून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे. पुन्हा कलम 370 चे लाभार्थी कोण, हे मला सांगायला लावू नका, अशी धमकीही द्यायची. ही धमकी म्हणजे पंतप्रधानांनी उधळलेला ‘गुलाल’ होता, असे जर सत्ताधारी मंडळींना वाटत असेल तर प्रश्नच संपला, असंही सेना म्हणाली.
(वाचा - राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात! अश्लील व्हिडीओ बनवून मागितली खंडणी)
मागील सात-आठ वर्षांत तर राजकीय विरोधक म्हणजे शत्रू, सरकारचे टीकाकार म्हणजे देशद्रोही असे एक ‘नरेटिव्ह’ तयार केले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज विरोधकांची टीका म्हणजे ‘चिखल’ वाटत आहे, पण मागील आठ वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने विरोधकांवर कोणता ‘गुलाल’ उधळला? फक्त चिखलफेकच केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांचा भाजप समर्थकांनी केलेला उपमर्द, हेटाळणी याला चिखल नाही तर काय म्हणायचे? असा सवालही सेनेनं केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Narendra Modi