सिंधुदुर्ग, 17 मे : मुंबई आणि इतर जिल्ह्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्यांच्या हातावर क्वारन्टइईनचे शिक्के मारणं सिंधुदुर्ग प्रशासनाने बंद केलं आहे. शिक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमुळे अनेक जणांना त्वचेचे गंभीर आजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे सिंधुदुर्ग प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आता मुंबईकरांना शिक्के न मारताच केवळ त्यांच्या हमीपत्रावर थेट त्यांच्या गावात पाठवण्यात येत असून या सगळ्यांची जबाबदारी आता त्या त्या गावातल्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या ग्रामकृतीदलांवर सोपवण्यात आली आहे .
दुसरीकडे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई , नवी मुंबई , ठाणे , पुणे , पालघर , रायगड , सोलापूर कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्याना आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सिंधुदुर्गची विलगीकरण क्षमता संपल्यामुळे आता सिंधुदुर्गात येणाऱ्यांना ई पासेस देण्यात येऊ नयेत असं कळवलं आहे. त्यामुळे अजूनही मुंबई आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोकणात येऊ इच्छिणाऱ्यांना प्रवेश दिला गेला नाही तर जिल्ह्याच्या सीमांवरती तणाव होण्याची शक्यता आहे .
ग्राम कृती दलांवर मुंबईकरांचा भार?
मुंबईतून कोकणात येणाऱ्यांचा ओघ काही थांबत नसून रोज हजारो मुंबईकर कोकणात येत आहेत . अशा साऱ्यांना आता शिक्के न मारताच घरी पाठवण्यात येणार असल्यामुळे अशी माणसे घराबाहेर पडणार नाहीत, याची जबाबदारी आता ग्रामकृतीदलांवर प्रशासनाने टाकली आहे . शिक्का हा मुंबई किंवा अन्य जिल्ह्यतून गावात आलेल्यांची ओळख म्हणून मारण्यात येत होत्ता . मात्र या शिक्क्यांमुळे इन्फेक्षन होत असल्याच्या कारणास्तव तो बंद करण्यात आला . त्यामुळे आता कुठली व्यक्ती होम क्वारन्टाइन आहे हे गावकऱ्यंच्या लक्षात येणार नाही. अशा व्यक्तीवर नजर ठेवणे हे जिल्हा प्रशासनाच्या नव्या आदेशामुळे आता ग्राम कृती दलाचे काम झाले आहे. अशा परिस्थितीत ग्राम कृती दलात असणाऱ्या आशा वर्कर्स , आरोग्यसेविका , आरोग्यसेवक , अंगणवाडी सेविका , पोलीस पाटील यांच्यावर दुहेरी ताण येणार आहे . शिवाय यातून गावागावातही वाद भडकण्याची शक्यता आहे .
कुणाचे घेणार स्वॅब? कोरोना चाचण्या होणार कमी?
होम क्वारंटाईन केलेल्या मुंबई किंवा इतर जिल्ह्यातून आलेल्या कुणाला कोरोना सदृश लक्षणे असतील तरच त्याना स्वॅब कलेक्षन सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे . तिथे त्यांचे स्वॅब घेउन ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. अहवाल येईपर्यंत त्यांना हॉस्पिटल आयसोलेशन मध्ये राहावे लागणार आहे. यासाठी सिंधुदुर्गात नव्याने तीन स्वॅब कलेक्षन सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. मात्र सिंधुदुर्गात सध्या कोरोना चाचणी सुविधा नसल्यामुळे मिरज आणि कोल्हापूरमधील लॅबवरच सिंधुदुर्ग प्रशासनाला अवलंबून राहाव लागणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus